खासगी रुग्णालयांनाही घेता येईल रक्तदान शिबीर

  Mumbai
  खासगी रुग्णालयांनाही घेता येईल रक्तदान शिबीर
  मुंबई  -  

  आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरीत रक्त उपलब्ध व्हावे, याकरीता ठिकठिकाणच्या सरकारी रुग्णालयात 'रक्तपेढीं'ची सेवा सुरू करण्यात आली आहे. तरीही अनेकदा या 'रक्तपेढीं'तून रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता खासगी रुग्णालयातही रक्तदान शिबीर घेण्याची परवानगी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आली आहे. जेणेकरून खासगी रुग्णालयातही पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होऊ शकेल. केंद्रीय आरोग्य विभागाने फेब्रुवारी महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई आणि उपनगरातील पाच मोठ्या रुग्णालयांनी याला प्रतिसाद देत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याची परवानगी मागितली आहे.

  वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, गोरेगावातील फोर्टिस रुग्णालय, परळमधील ग्लोबल रुग्णालय, पालघरमधील वेदांत इन्स्टिट्यूट, नवी मुंबईतील अपोलो या रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांचा त्यात समावेश आहे. दादर येथील आशीर्वाद, कुर्ल्यातील कोहिनूर, अंधेरीतील सेव्हन हिल्स, ठाण्यातील ज्युपिटर या रुग्णालयांनी अजूनही आरोग्य विभागाच्या या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. 

  याआधी सरकारी, निमसरकारी, पालिका, विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांनाच केवळ रक्तशिबिरांचे आयोजन करता येते होते. पण, नव्या बदलामुळे खासगी रुग्णालयांनाही आवश्यकतेनुसार शिबिरांचे आयोजन करता येईल. मात्र, यासाठी या रुग्णालयांना रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवश्यक तांत्रिक ज्ञान असलेल्या 8 ते 10 कर्मचाऱ्यांची भरतीही करावी लागणार आहे, असे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद सहाय्यक संचालक डॉ. थोरात यांनी सांगितले.

  तर, खासगी रुग्णालयांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची परवानगी मिळाली असली तरी, ही रुग्णालये रक्तदान शिबिरे आयोजित करतील आणि रुग्णांपर्यंत रक्त उपलब्ध होईल, याबद्दल साशंकता आहे, असे मत या थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी व्यक्त केले.

  विश्वस्त संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांना प्रथम त्या रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांमधून रक्त उपलब्ध होणे आवश्यक असते. रुग्णांना बाहेरून रक्तदाता आणण्यास सांगणे चुकीचे आहे. पण, अनेकदा याबाबत रुग्णांकडून तक्रार केली जात नाही. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून रक्तपेढ्यांना नोटीस पाठवणे किंवा परवाना रद्द करणे आदी कारवाई करता येत नाही. त्यामुळे यापुढे रुग्णालयांकडून रक्त उपलब्ध केले जात नसेल, तर रुग्णांनी वा नातेवाईकांनी ‘राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे’कडे याची लेखी तक्रार करावी. यावर तातडीने कारवाई केली जाईल.

  - डॉ. अरुण थोरात, साहाय्यक संचालक, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.