२२ वर्षांनी वरळीतील डॉल्फिन मनोऱ्याला नवी झळाळी

वरळी येथे समुद्रात २२ वर्षांपूर्वी उभारलेल्‍या डॉल्फिन मनोऱ्याला नवी झळाळी मिळणार आहे. या दोन मनोऱ्यांची डागडुजी, रंगरंगोटी केली जाणार असून सौर सागरी दिवे बसवण्यात आले आहेत. तसेच गंज प्रतिरोधक शिडी आणि कठडेही नव्याने लावण्यात येणार आहेत.

तसेच डॉल्फिन मनोऱ्याची दुरूस्‍ती करताना चोरीच्‍या घटना रोखण्‍यासाठी फ्लॅप गेट बांधण्‍यात येणार आहे. संरचनांचे रंगकाम केले जाणार आहे. ही सर्व कामे विशेष स्‍वरूपाची असून त्‍यासाठी तज्‍ज्ञांची मदत घेतली जाईल.

मलनि:स्‍सारण व प्रचलन खात्‍यामार्फत विविध पर्यावरण पूरक बाबींचे नियोजन आणि व्‍यवस्‍थापन नियमितपणे करण्‍यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि मलनि:स्‍सारण प्रचालन विभागाचे प्रमुख अभियंता सतिश चव्‍हाण यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण सुचना दिल्या आहेत.  

मुंबईचे विशिष्ट भौगोलिक स्थान लक्षात घेऊन तसेच मुसळधार पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी लव्हग्रोव्ह (वरळी) येथे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने उदंचन केंद्रे अर्थात पर्जन्‍य जलउदंचन केंद्र उभारले आहे. त्‍यात दोन उदंचन केंद्र आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाचा समावेश आहे. हे उदंचन केंद्र जानेवारी १९९१ पासून कार्यान्वित झाले असून वर्षातील ३६५ दिवस अविरत कार्यरत असते.

लव्‍हग्रोव्‍ह उदंचन केंद्रातून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्‍त सांडपाणी बाहय बोगद्यातून ३.५ किलोमीटर लांब वाहिनीद्वारे समुद्रात सोडले जाते. या सागरी बोगदयाची देखभाल केली जाते.

वरळी सागरी बोगदयाचे ठिकाण आणि त्याच्‍या पातमुखाचे स्थान दर्शविण्‍यासाठी बोगदयाच्‍या शेवटी, समुद्राच्या आत दोन मनोरे उभारण्‍यात आले आहेत. डॉल्फिन टॉवर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या डॉल्फिन मनो-याच्‍या छतावर सौर उर्जेवर चालणारे दिवे लावण्‍यात आले आहेत.


हेही वाचा

राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच, योजनेचा लाभ कसा घ्याल?

वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे नामकरण वीर सावरकर सेतू करण्यात आले

पुढील बातमी
इतर बातम्या