बीडीडीवासीयांची नाराजी म्हाडाकडून दूर, १२५ हून अधिक रहिवाशांचा संक्रमण शिबिरात जाण्यास होकार

आधी करारनामा मग स्थलांतर अशी भूमिका घेत आक्रमक झालेल्या बीडीडीवासीयांचा विरोध दूर करण्यात अखेर मुंबई मंडळाला यश आलं आहे. कारण मुंबई मंडाळाच्या वितरण पत्राचा-करारनाम्याचा स्वीकार करत आतापर्यंत ना. म. जोशी येथील १२५ हून अधिक बीडीडीवासीयांनी संक्रमण शिबिरात जाण्यास तयारी दर्शवल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळं आता लवकरच बीडीडीवासीयांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

करारनाम्याचं वाटप

ना. म. जोशी इथं अंदाजे ४०० रहिवासी असून या सर्व रहिवाशांना महिन्याभरापूर्वी संक्रमण शिबिरातील घराच्या वितरण पत्रासह करारनाम्याचं वाटप करण्यात आलं. या वितरण पत्रासह करारनाम्यावर सही करून देणं बीडीडीवासीयांकडून अपेक्षित होतं. दरम्यान बीडीडीतील काही संघटनांचा, रहिवाशांचा अजूनही म्हाडाला विरोध आहे. तर म्हाडाकडून करारनामा न करता संक्रमण शिबिरात हलवल जात असल्याचं म्हणत काही जणांनी संक्रमण शिबिरात जाण्यासही विरोध केला होता. त्यामुळं बीडीडीवासीयांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करणं हे मुंबई मंडळासाठी मोठं आव्हान तयार झालं होतं.

करारानाम्यावर सही करण्यास सुरूवात

अखेर मुंबई मंडळानं हे आव्हान यशस्वीरित्या पेललं असून पुनर्विकासातील मोठा टप्पा मंडळानं पार केला आहे. कारण रहिवाशांना स्थलांतरीत केल्यानं आता तिथं पाडकाम सुरू करत पुनर्विकासाच्या कामाला वेग देणं मंडळाला सहजसोप होणार आहे. मंडळानं दिलेलं वितरण पत्र स्वीकारत करारानाम्यावर सही करण्यास बीडीडीवासीयांनी सुरूवात केली आहे.

आतापर्यंत अंदाजे १४० बीडीडीवासीयांनी संक्रमण शिबिरात जाण्यास होकार दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर ना. म. जोशी बीडीडी चाळ पुनर्विकास समन्वय समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनीही याला दुजोरा दिला आहे. उर्वरित बीडीडीवासीयांकडूनही लवकरच होकार देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिवाळी टाॅवरमधल्या घरात

संक्रमण शिबिरात स्थलांतरीत होण्यास होकार दर्शवलेल्या बीडीडीवासीयांचं आता लवकरच संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यांच्या मागणीनुसार दिवाळीत वा दिवाळीनंतर त्यांना घराची चावी देण्याची मुंबई मंडळाची तयारी आहे. दरम्यान एक रहिवासी तर १५ दिवसांपूर्वीच संक्रमण शिबिरात स्थलांतरीत झाल्यानं त्याची दिवाळी टाॅवरमधल्या घरात साजरी होणार आहे.


हेही वाचा-

ना. म. जोशीतील बीडीडीवासीयांची दिवाळी संक्रमण शिबिरातल्या नव्या घरात!

Exclusive: म्हाडा तोंडावर आपटलं! परळमधली २९ महागडी घर विजेत्यांनी केली परत


पुढील बातमी
इतर बातम्या