ना. म. जोशीतील बीडीडीवासीयांची दिवाळी संक्रमण शिबिरातल्या नव्या घरात!

करारनामा आणि वितरण पत्रावर सह्या झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करत येत्या काही दिवसांतच बीडीडीवासीयांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

SHARE

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अखेर बुधवार, २६ सप्टेंबरपासून ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडीवासीयांना संक्रमण शिबिराच्या घराच्या वितरण पत्रासह करारनाम्याचं वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. करारनामा आणि वितरण पत्रावर सह्या झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करत येत्या काही दिवसांतच बीडीडीवासीयांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे ना. म. जोशी मार्ग येथील ४०० हून अधिक बीडीडीवासीयांची यंदाची दिवाळी टाॅवरमधल्या, संक्रमण शिबिरातील नव्या कोऱ्या घरात साजरी होण्याची शक्यता दाट झाली आहे.


पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात

वरळी, ना. म.जोशी आणि नायगाव येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास मुंबई मंडळाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार ना. म. जोशी आणि नायगावमधील पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात झाली आहे. तर या दोन्ही ठिकाणच्या रहिवाशांची पात्रताही निश्चित झाली आहे.


जीव मुठीत घेऊन वास्तव्य

महत्त्वाचं म्हणजे या बीडीडीवासीयांसाठी संक्रमण शिबिराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रहिवाशांच्या मनाप्रमाणे संक्रमण शिबिरं देण्यात आली आहे. पण रहिवासी मात्र संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसल्याचं चित्र आहे. बीडीडीवासीयांच्या अनेक मागण्या आणि तक्रारी असून त्या मार्गी लागल्याशिवाय रहातं घर सोडणार नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळेच इमारतीचा भाग कोसळत असतानाही जीव मुठीत घेऊन रहिवाशी तिथंच राहत आहेत.


दुर्घटना सुरूच

साधारणत: २० दिवसांपूर्वी ना. म. जोशी येथील इमारत क्रमांक १२ च्या छताचा काही भाग कोसळला होता. सुर्देवानं यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती, पण हा अपघात तसा मोठा होता. हे कमी की काय म्हणून २३ सप्टेंबरला नायगाव येथील इमारत क्रमांक १ बी रु.नं. ७४ च्या छताचा काही भाग कोसळला आहे. ना. म. जोशी आणि नायगावमधील सर्वच इमारतींची दुरावस्था झाली असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीडीडीवासीयांना शक्य तितक्या लवकर संक्रमण शिबिरात हलवण्याच्या प्रक्रियेला आता मुंबई मंडळानं वेग दिला आहे.


महिन्याभरात स्थलांतर

बुधवारी ना. म. जोशी येथील अंदाजे २०० बीडीडीवासीयांना संक्रमण शिबिराच्या घराचं वितरण पत्र आणि करारनामा वाटप करण्यात आला आहे. तर गुरूवारी उर्वरित २०० बीडीडीवासीयांना वितरणपत्र नि करारनामा वाटप करण्यात येणार असल्याचंही वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. या वितरणपत्र आणि करारनाम्यावर रहिवाशांची सही झाल्यास पुढील प्रक्रिया पूर्ण करत प्रकाश काॅटन मिल, रूबी मिलसह अन्य ठिकाणच्या संक्रमण शिबिरात रहिवाशांना हवलण्यात येणार आहे. साधरणत: महिन्याभरात बीडीडीवासीय स्थलांतरीत होतील, असा अंदाज आहे.


साशंकता कायम

मात्र हा अंदाज खरा ठरतो की खोटा हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण वितरणपत्र-करारनामा वाटप सुरू झालं असलं, तरी बीडीडीवासीय सह्या करून लवकरात लवकर संक्रमण शिबिरात जातील का याबाबत साशंकता आहे. ना. म. जोशी येथील अंदाजे ५० रहिवाशांची पात्रता अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे त्यांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार नसल्याची माहिती ना. म. जोशी बीडीडी चाळ पुनर्विकास समन्वय समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी दिली आहे.

तर जोपर्यंत या रहिवाशांची पात्रता निश्चित होत नाही, त्यांनाही संक्रमण शिबिरात हलवलं जात नाही तोपर्यंत आम्हीही राहतं घर सोडणार नाही, असा निर्धार येथील बीडीडीवासीयांनी केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबई मंडळानं मात्र ज्यांची पात्रता अद्याप निश्चित झालेली नाही त्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असं सांगितलं आहे. १ आॅक्टोबरला काही रहिवाशांची सुनावणी असून त्यात हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. त्यामुळं महिन्याभरात रहिवासी संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.हेही वाचा-

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी ६२५ झाडांचा बळी

नाम जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीच्या इमारतीचा भाग कोसळलासंबंधित विषय
ताज्या बातम्या