११९४ घर आणि १०८ दुकानांची लाॅटरी; पण तारीख काही ठरेना

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी महिन्याभरापूर्वीच लाॅटरी फुटली असून २ आॅक्टोबरला सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांसाठी लाॅटरी फुटणार आहे. काही दिवसांच्या अंतरानं इतक्या मोठ्या संख्येनं नवी मुंबई आणि कोकण परिसरात घरं उपलब्ध झाली असली तरी हजारो इच्छुक आतुरतेनं वाट पाहत आहेत ती मुंबईतील घरांच्या लाॅटरीची. पण मुंबई मंडळाच्या लाॅटरीचा मुहूर्तच ठरताना दिसत नाही.

शुक्रवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मुंबईतील ११९४ घर आणि १०८ दुकानांची लाॅटरी फुटणार असल्याचं जाहीर केलं. पण त्याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आणि लाॅटरी कोणत्या दिवशी फुटणार हे मात्र जाहीर केलेलं नाही. त्यामुळं लाॅटरीची प्रतिक्षा संपलेली नाही.

१५ दिवसांत जाहिरात 

काही घरांच्या किंमती निश्चित होणं अद्याप बाकी आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसांत या किंमती निश्चित करत येत्या पंधरा दिवसांत जाहिरात आणि लाॅटरीची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. त्याअनुषंगाने जाहिरात दिवाळीआधी प्रसिद्ध होऊन डिसेंबरमध्ये लाॅटरी फुटण्याची शक्यता आहे.

आकडा फुगवला

मे २०१८ मध्ये मुंबईतील १००० घरांसाठी लाॅटरी फुटेल असं डिसेंबर २०१७ मध्ये जाहीर केलं होतं. पण मुंबई मंडळाकडं घरचं नसल्यानं मे ची डेडलाईन चुकली. अखेर आता मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कशीबशी इथून तिथून घर शोधून घरांचा आकडा ११९४ पर्यंत फुगवला आहे. याच  घरांसाठी लाॅटरी काढण्याची तयारी मंडळानं सुरू केली आहे.  पण या लाॅटरीचीही तारीख काही ठरताना दिसत नाही. शुक्रवारी सामंत यांनी लाॅटरीतील घरांची माहिती, किंमतींची माहिती दिली खरी, पण जाहिरातीची आणि लाॅटरीची तारीख अद्याप अधांतरीच आहे.

१० वर्षानंतर लाॅटरी 

११९४ घरांबरोबर १०८ दुकानांसाठीही लाॅटरी काढण्यात येणार आहे. मात्र दुकानांची लाॅटरी घरांच्या लाॅटरीसारखी नसते. मुंबई मंडळाकडून दुकानांची एक निश्चित किंमत जाहीर केली जाते. त्यानुसार इच्छुकांकडून अर्ज मागवत जे अर्जदार अधिक किंमत लावतील त्यांना दुकानाचं वितरण केलं जातं. साधारणत दहा वर्षानंतर मुंबईतल्या दुकानांसाठी लाॅटरी फुटणार असल्याने इच्छुकांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असणार आहे.


हेही वाचा - 

आरेतील झाडांच्या कत्तलीवरून एमएमआरसी-पर्यावरणप्रेमी पुन्हा आमने-सामने

Exclusive : नॅशनल पार्कमधील आदिवासी ४८० चौ. फुटाच्या रो-हाऊसमध्ये! म्हाडा बांधणार मरोळ-मरोशीत रो-हाऊस


पुढील बातमी
इतर बातम्या