Advertisement

आरेतील झाडांच्या कत्तलीवरून एमएमआरसी-पर्यावरणप्रेमी पुन्हा आमने-सामने

आरेमधील युनिट १९ मध्ये सकाळी एमएमआरसीच्या कर्मचाऱ्यांनी झाडं कापण्यास सुरूवात केली. याची माहिती मिळताच सेव्ह आरेच्या सदस्या तसमीन शेख यांनी युनिट १९ मध्ये धाव घेतली आणि बेकायदा हे काम होत असल्याचं म्हणत या कर्मचाऱ्यांना रोखून धरलं. त्यामुळे एमएमआरसीच्या कर्मचाऱ्यांनी इथून पळ काढला.

आरेतील झाडांच्या कत्तलीवरून एमएमआरसी-पर्यावरणप्रेमी पुन्हा आमने-सामने
SHARES

मेट्रो ३ आरे कारशेडचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत आहे. तर दुसरीकडे यावरून पर्यावरण प्रेमी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) मध्ये नेहमीच सामना रंगताना दिसत आहे. असाच सामना शुक्रवारी दुपारी आरे काॅलनीतीला युनिट १९ मध्ये पहायला मिळाला. तर या सामन्यात बाजी मारली ती पर्यावरण प्रेमींनी.



पाच झाडांचा बळी 

आरेमधील युनिट १९ मध्ये सकाळी एमएमआरसीच्या कर्मचाऱ्यांनी झाडं कापण्यास सुरूवात केली. याची माहिती मिळताच सेव्ह आरेच्या सदस्या तसमीन शेख यांनी युनिट १९ मध्ये धाव घेतली आणि बेकायदा हे काम होत असल्याचं म्हणत या कर्मचाऱ्यांना रोखून धरलं. त्यामुळे
एमएमआरसीच्या कर्मचाऱ्यांनी इथून पळ काढला. मात्र, तोपर्यंत येथील पाच झाडांचा बळी गेला होता. पर्यावरणवादी या कामाला बेकायदा ठरवत असले तरी एमएमआरसीनं मात्र आपण कुठल्याही प्रकारे बेकायदा झाडं कापत नसल्याचं मुंबई लाइव्हला सांगितलं आहे. त्यामुळं काम बेकायदा की कायदेशीर हा कळीचा मुद्दा बनला आहे.


१० ऑक्टोबरला जनसुनावणी 

आरे विरोधातील राष्ट्रीय हरित लवादातील याचिका वनशक्तीने मागे घेतली आहे. त्यामुळे आरेतील कामावर आता बंदी राहिलेली नाही, असं म्हणत एमएमआरसीने आरेतील कामाला वेग दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आरतील २७०२ झाडं कापण्यासाठी एमएमआरसीने नुकतीच वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. यावर वृक्ष प्राधिकरणाकडून सूचना, हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार १० ऑक्टोबरला यावर जनसुनावणी होणार आहे.


न्यायालयाचा निर्णय धाब्यावर 

वृक्ष प्राधिकरणाची परवानगी नसतानाही शुक्रवारी सकाळी युनिट १९ मध्ये एमएमआरसीने बेकायदा झाडं कापण्यास सुरुवात केल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच आपण तिथे धाव घेतली असता कोणतीही परवानगी नसल्याचं उघड झालं. झाड कापताना ट्री ऑफिसर तिथं उपस्थित असायला हवं या न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवलं गेलं अाहे. बेकायदा काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावत १५ झाडं वाचवली असून या बेकायदा कामाविरोधात संबंधित यंत्रणाकडे तक्रार केली जाणारअसल्याचंही शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

परवानगीचा दावा 

याविषयी एमएमआरसीच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, त्यांनी झाडं कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची आवश्यक ती परवानगी असल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रीय हरीत लवादातील याचिका मागे घेण्यात आल्याचं म्हणत आरेत होणारी सर्व काम कायदेशीरच असल्याचं स्पष्ट केलं आहे. सेव्ह आरे मात्र हे काम बेकायदा असल्याच्या दाव्यावर ठाम आहे.  यावेळी झाडं कापणाऱ्यांकडे परवानगीची कोणतीही कागदपत्र नसल्याचं सेव्ह आरेच्या सदस्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आरे कारशेड आणि झाडांची कत्तल यावरून यापुढंही वातावरण असंच तापलेलं राहणार असल्याची चर्चा आहे.



हेही वाचा - 

Exclusive : नॅशनल पार्कमधील आदिवासी ४८० चौ. फुटाच्या रो-हाऊसमध्ये! म्हाडा बांधणार मरोळ-मरोशीत रो-हाऊस

आरेतील २७०२ झाडांवर लवकरच कुऱ्हाड? १० आॅक्टोबरला जनसुनावणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा