जानेवारीपासून बीकेसीतील चाकरमान्यांचं टाइमटेबल बदलणार

बीकेसी. आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होणारा परिसर. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत बीकेसीमध्ये सरकारी आणि बहुराष्ट्रीय खासगी कंपन्यांचं जाळं उभं राहिल्याने इथं नोकरी धंद्यानिमित्ताने येणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. दररोज तब्बल २ लाख चाकरमानी आणि २० हजार वाहने बीकेसीत येतात. त्यामुळे बीकेसीतील गर्दी आणि वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने बीकेसीतील कार्यालयांची वेळ बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा बाहेर काढला आहे.

यापूर्वी झाली होती चाचपणी

यापूर्वीही 'एमएमआरडीए'ने वेळ बदलण्याचा प्रस्ताव तयार करून त्यासंदर्भात चाचपणीही सुरू केली होती, पण प्रत्यक्षात वेळ काही बदलली गेली नाही. असं असताना बीकेसीत मेट्रो-२ 'ब'सह मेट्रो-३ चं काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे बीकेसीतील गर्दी आणि वाहतूककोंडीचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. म्हणूनच 'एमएमआरडीए'ने आतापर्यंत गुंडाळून ठेवलेला बीकेसीतील कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा बाहेर काढला आहे.

गर्दी, वाहतूककोंडीचा प्रश्न 

मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणारा गर्दी आणि वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बीकेसीतील कार्यालयीन वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नव्या वर्षात अर्थात जानेवारी २०१८ पासून कार्यालयाच्या वेळा बदलतील, अशी माहिती 'एमएमआरडीए'चे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रविण दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

'अशी' बदलेल वेळ

सध्या बीकेसीतील सर्वच्या सर्व कार्यालयांच्या वेळा सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० अशी वा सकाळी १० ते सायंकाळी ६.३० अशा आहेत. यापुढे मात्र काही कार्यालये सकाळी ८, ९, १० आणि ११ याप्रमाणे सुरू होतील. तर पुढे ४, ५, ६ आणि ७ याप्रमाणे कार्यालये सुटतील. तर प्रत्येक कार्यालय आपल्या सोयीप्रमाणे यातील वेळ निवडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यालयाच्या वेळा बदलण्यासाठी 'एमएमआरडीए'ने एक सर्व्हे करत तो बीकेसीतील कार्यालयांसमोर मांडला होता. त्याला सर्व कार्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद देत वेळा बदलण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे जानेवारीपासून बीकेसीतील वेळा बदलतील.

- प्रविण दराडे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए


हेही वाचा-

बीकेसीत बुलेट ट्रेन आणि आयएफएससी सेंटरही?


पुढील बातमी
इतर बातम्या