कोस्टल रोडवरून राज ठाकरे आक्रमक; वरळीतील कोळी बांधवांची घेतली भेट

मुंबई महानगरपालिकेचा आणि शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या कोस्टल रोडवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या वरळीतील कोळी बांधवांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून लवकरच याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करू, असं आश्वासन राज यांनी स्थानिक कोळी बांधवाना दिलं. यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, स्थानिक विभाग अध्यक्ष संतोष धुरी व मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रजनन ठिकाणी भराव

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून नरीमन पाॅईंट ते मालाड मार्वे असा ३५.६० किमी मार्गाचा कोस्टल रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कोस्टल रोडमधील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचं काम पालिका करणार आहे. त्यानुसार पालिकेनं कोस्टल रोडच्या कामाला जोरात सुरूवात केली आहे. प्रियदर्शनी इथं समुद्रात भराव टाकण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र माशांच्या प्रजननाची ही खडकाळ जागा आहे. या ठिकाणीच मासे मोठ्या प्रमाणात अंडी देतात. त्यामुळं शेवण, कोळंबीसारखे अन्य मासे वरळी आणि इतर भागातील मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात सापडतात.

बोटींना अडथळा

आता याच खडकाळ भागात भराव टाकत ही जागा पूर्णपणे बंद केली जात आहे. त्यामुळे आता मासे नष्ट होणार असून आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचं मार्शल कोळी यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी या कामासाठी समुद्रात अनेक ठिकाणी खांब उभे करण्यात आल्यानं मच्छिमारांच्या बोटी जाण्यासही अडथळा निर्माण झाला आहे.  या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी स्थानिक कोळी बांधवांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथ भेट घेतली होती. या भेटीत तुम्ही कोळीवाड्यात येऊन आमचा या प्रकल्पाला विरोध का आहे, हे एकदा पाहा, अशी विनंती कोळी बांधवांनी राज ठाकरेंना केली होती. 

अायुक्तांशी लवकरच चर्चा

या विनंतीनंतर रविवारी राज ठाकरे यांनी सकाळी नऊच्या सुमारास कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या वरळीतील कोळी बांधवांची भेट घेतली. यावेळी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून लवकरच याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी लवकरच चर्चा करू असं, आश्वासन राज यांनी स्थानिक कोळी बांधवाना दिलं. 

संघर्षाची शक्यता 

 कोस्टल रोड हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून रविवारी या प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा - 

कोस्टल रोडविरोधात मच्छिमार अाक्रमक; प्रकल्पाला जोरदार विरोध


पुढील बातमी
इतर बातम्या