Advertisement

कोस्टल रोडविरोधात मच्छिमार अाक्रमक; प्रकल्पाला जोरदार विरोध

प्रियदर्शनी इथं समुद्रात भराव टाकला जात आहे ती जागा माशांच्या प्रजननाची खडकाळ जागा आहे. या ठिकाणीच मासे मोठ्या प्रमाणात अंडी देतात. त्यामुळं शेवण, कोळंबीसारखे अन्य मासे वरळी आणि इतर भागातील मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात सापडतात.

कोस्टल रोडविरोधात मच्छिमार अाक्रमक; प्रकल्पाला जोरदार विरोध
SHARES

मुंबई महानगरपालिकेचा आणि शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पुन्हा एकदा वादात अडकला आहे. कारण या प्रकल्पाला असलेला मच्छिमारांचा विरोध पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. या प्रकल्पामुळं मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचं म्हणत वरळीतील मच्छिमारांनी या प्रकल्पाविरोधात आता एल्गार पुकारला आहे.


...तर पालिकेला घेराव

 माशांचं प्रजनन सर्वाधिक होतं त्याच ठिकाणी भराव टाकत रस्ते बांधले जात आहेत असं म्हणत मच्छिमारांनी या प्रकल्पाचा मार्ग बदलण्याची मागणी आता नव्यानं उचलून धरली आहे. तर यासाठी आता ते आक्रमक झाले असून येत्या आठवड्याभरात हा प्रश्नाकडे पालिकेने लक्ष दिले नाही तर वरळीसह इतर कोळीवाड्यातील मच्छिमार रस्त्यावर उतरतील आणि पालिकेला घेराव घालतील,  असा इशारा अखिल मच्छिमार कृती संघटनेचे युवा अध्यक्ष मार्शल कोळी यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिला आहे. 


प्रजनन ठिकाणी भराव

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून नरीमन पाॅईंट ते मालाड मार्वे असा ३५.६० किमी मार्गाचा कोस्टल रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कोस्टल रोडमधील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचं काम पालिका करणार आहे. त्यानुसार पालिकेनं कोस्टल रोडच्या कामाला जोरात सुरूवात केली आहे. प्रियदर्शनी इथं समुद्रात भराव टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

मात्र प्रियदर्शनी इथं समुद्रात भराव टाकला जात आहे ती जागा माशांच्या प्रजननाची खडकाळ जागा आहे. या ठिकाणीच मासे मोठ्या प्रमाणात अंडी देतात. त्यामुळं शेवण, कोळंबीसारखे अन्य मासे वरळी आणि इतर भागातील मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात सापडतात.


बोटींना अडथळा

आता याच खडकाळ भागात भराव टाकत ही जागा पूर्णपणे बंद केली जात आहे. त्यामुळे आता मासे नष्ट होणार असून आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचं मार्शल कोळी यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी या कामासाठी समुद्रात अनेक ठिकाणी खांब उभे करण्यात आल्यानं मच्छिमारांच्या बोटी जाण्यासही अडथळा निर्माण झाला आहे. 


तीव्र आंदोलन

 दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची वरळीतील मच्छिमारांनी भेट घेत कोस्टल रोडचा मार्गात बदल करण्याची मागणी केली. पण यावर आयुक्तांकडून कोणतही समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यानं आता मच्छिमारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हणत कोळी यांनी आठवड्याभरानं मच्छिमारांकडून तीव्र आंदोलन केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे.


शिवसेना विरूद्ध मनसे?

कोस्टल रोड हा शिवसेनेचा, त्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट. असं असताना याच प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांच्या समर्थनार्थ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी मच्छिमारांना पाठिंबा दिला असून त्यांचं म्हणणं एेकण्यासाठी राज ठाकरे रविवारी, १६ डिसेंबरला सकाळी ९ वाजता वरळी कोळीवाड्याला भेट देणार आहेत. त्यामुळं कोस्टल रोड प्रकल्पावरून शिवसेना विरूद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




हेही वाचा - 

कोस्टल रोडचं भूतांत्रिक सर्वेक्षण तातडीनं करा-आयुक्तांचे आदेश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा