मुंबईतील महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह ट्विन टनेल प्रकल्पाने आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. “मावळा” नावाच्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) 70 मीटरपर्यंत खोदकाम करम्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) यांच्या देखरेखीखाली डिसेंबर 2025 मध्ये ऑरेंज गेट येथील लाँचिंग शाफ्टमधून टनेल खोदकामाला सुरुवात करण्यात आली होती.
9.2 किलोमीटर लांबीचा हा ट्विन टनेल प्रकल्प ईस्टर्न फ्रीवे ते मरीन ड्राइव्ह दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी विकसित केला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास अवघ्या 5 ते 7 मिनिटांत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
MMRDA च्या माहितीनुसार, “मावळा” TBM ने नियोजित 3,720 मीटरपैकी पहिल्या टप्प्यातील 70 मीटर खोदकाम पूर्ण केले आहे. संपूर्ण भूमिगत खोदकाम पूर्ण करण्यासाठी या मशीनला सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. तसेच कामाचा वेग वाढवण्यासाठी जर्मनीहून आणण्यात येणारे दुसरे TBM देखील लवकरच प्रकल्पात सहभागी होणार आहे.
सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मुंबईतील सर्वात तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानले जात आहे. कारण टनेलचा मार्ग दाट लोकवस्ती, वारसा स्थळे, रेल्वे मार्ग आणि शेकडो इमारतींच्या खालून जाणार आहे.
हे बोगदे 12 ते 52 मीटर खोलीवर अत्याधुनिक स्लरी-शील्ड TBM तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधले जात असून मुंबईच्या किनारी भौगोलिक परिस्थितीनुसार ही यंत्रणा वापरण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वी TBM ऑपरेशनचे उद्घाटन करत प्रकल्प जून 2028 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.
हा टनेल दक्षिण मुंबईसाठी महत्त्वाचा ईस्ट-वेस्ट ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर ठरणार असून तो इर्स्टन फ्रि वे (Eastern Freeway), मरीन ड्राइव्ह (Marine Drive), मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link), कोस्टल रोड आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) यांना जोडणार आहे.
हेही वाचा