अवघ्या १४ मिनिटांत गाठता येईल एलिफंटा! सरकार बांधणार रोप-वे

मुंबईचं पुरातनकालीन वैभव असलेल्या एलिफंटा लेण्यांना भेट देण्यासाठी पर्यटाकांना आता केवळ १४ मिनिटांचाच वेळ लागणार आहे. कारण केंद्र सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबई ते एलिफंटा दरम्यान रोप-वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्रात रोप-वे बांधण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असेल. गेल्याच आठवड्यात केंद्राच्या आर्थिक सल्लागार समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली अाहे.

८ किमीचा रोप-वे

सद्यस्थितीत मुंबईच्या गेट वे आॅफ इंडिया जेट्टीवरून एलिफंटा बेट गाठण्यासाठी बोटीच्या माध्यमातून पाऊण ते एक तास लागतो. रोप-वे च्या माध्यमातून हा वेळ बराच कमी होणार आहे. हाजी बंदर ते एलिफंटा असा ८ किमी ३०० मीटर लांबीचा रोप-वे बांधण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे काम २०२२ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

किती रूपये खर्च?

सूत्रांच्या माहितीनुसार, रोप-वे उभारण्यासाठी ६०० कोटी रूपयांहून अधिक खर्च येणार आहे. रोप-वे च्या कामाला ऑगस्ट २०१९ च्या अखेरपर्यंत सर्व परवानग्या मिळाल्यावर महिन्याभराने प्रकल्पाचं बांधकाम सुरू करण्यात येईल. या प्रकल्पाची उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर होणार आहे. हा रोप-वे समुद्राच्या पाण्यापासून १५० मीटर उंचीवर असेल. हा प्रस्तावित रोप-वे जगातील सर्वात जास्त लांबीचा असेल, म्हटलं जात आहे.

पर्यटकांचं आकर्षण

याआधी शिवडी ते एलिफंटा अशी ६.९ किमीची ३० आसनी ‘केबल कार’ सुरु करण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. परंतु या परिसरातील जैवविविधतेला धोका पोहोचत असल्याने हा प्रस्ताव गुंडाळावा लागला होता. एलिफंटा बेटाला युनेस्कोने 'वर्ल्ड हेरिटेज साइट'चा दर्जा दिला आहे. या बेटाला दरवर्षी लाखों देशी-परदेशी पर्यटक भेट देत असतात. रोप-वे बांधल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल, अशी शक्यता मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केली.

फेब्रुवारी २०१८ मध्ये एलिफंटा बेटावर तब्बल ७० वर्षांनंतर वीज पोहोचली. महावितरण कंपनीने समुद्राच्या तळाखालून विजेच्या केबल्स टाकत हा वीजपुरवठा केला.


हेही वाचा-

महावितरणाच्या विजेने झगमगणार एलिफंटा

दक्षिण मुंबईतील इमारतींचा जागतिक वारसा यादीत समावेश


पुढील बातमी
इतर बातम्या