वर्सोवा पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली, मुंबई-सुरत प्रवास सुखकर

Picture Source: Twitter
Picture Source: Twitter

घोडबंदर येथे वर्सोवा खाडीवर बांधण्यात आलेला नवीन वर्सोवा पूल मुंबई आणि ठाणे येथून सुरतकडे जाणाऱ्या एका मार्गासाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात ट्विट करून पूल खुला करण्याचे संकेत दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे जुन्या वर्सोवा पुलावरील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई तसेच ठाण्यातून पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडबंदर येथील वर्सोवा खाडी पार करावी लागते. या खाडीवरील पहिला पूल 1968 मध्ये बांधण्यात आला. हा पूल कमकुवत झाल्याने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जुन्या वर्सोवा पुलाच्या पुढे नवीन वर्सोवा पुलाचे बांधकाम सुरू केले.

या पुलाला 4 लेन असून जानेवारी 2018 मध्ये या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असले तरी 20 फेब्रुवारीची उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल लवकरच खुला करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली आणि सायंकाळी सात वाजता पुलाची एक लेन खुली करण्यात आली, अशी घोषणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आली.

या पुलाचा सुरतकडे जाण्याचा मार्ग खुला झाल्याने जुन्या पुलावर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीपासून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एनएचएआयचे प्रकल्प संचालक मुंकुद अत्तर्डे यांनी सांगितले की, मुंबईकडे जाणारा मार्ग पावसाळ्यात पूर्ण होईल.


हेही वाचा

कोस्टल रोड बांधकामामुळे पाच महिन्यांसाठी वाहतुकीत बदल

मुंबई मेट्रो 2024 पर्यंत आणखी 2 मार्ग सुरू करू शकते

पुढील बातमी
इतर बातम्या