ठाणे : ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील भुयारी मार्ग लवकरच सुरू होणार

पूर्व द्रुतगती मार्गावरील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा मार्ग खुला केला जाईल, असे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

महामार्गाखालील भास्कर कॉलनीमार्गे ठाणे शहरात येण्यासाठी तसेच कोपरी आणि भास्कर कॉलनीतून ज्ञानसाधना महाविद्यालयाकडे येण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जाणार आहे. भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीए करत असून त्याखालच्या नाल्याचे काम ठाणे महापालिका करत आहे.

भुयारी मार्ग आणि सर्व्हिस रोड जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासोबत भुयारी मार्गाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.

नाल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात भराव टाकून रस्ता करण्यात येणार आहे. 15 जूनपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल अशा पद्धतीने उर्वरित कामाचे नियोजन करावे, अशी सूचना आयुक्त बांगर यांनी केली.

अपलाब चौकाचे काम सुरू

एलबीएस रोडवरील महत्त्वाचा चौक असलेल्या अपलाब चौकाच्या काँक्रिटीकरणाचे कामही सुरू आहे. मध्यवर्ती भागातील काम पूर्ण होत असल्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही. 

त्याचबरोबर उर्वरित रस्त्याचे काम करतानाही बहुतांश रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहील, अशी व्यवस्था करावी, असे बांगर यांनी सांगितले. 

नितीन कंपनी जंक्शन येथील रस्ता दुरुस्तीबाबत आयुक्तांनी मागील पाहणी दौऱ्यात सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मुख्य वाहतूक मार्ग पूर्ण झाला आहे. पण फूटपाथ तसेच बाजूची पट्टी आणि काही पॅच राहिला आहे. काम पूर्ण करून रस्ता दुभाजक दुरुस्त करण्याच्याा सूचनाही त्यांनी दिल्या.

बांधकामाधीन रस्ते वाहतुकीसाठी योग्य करावेत

शहरातील 282 रस्त्यांबरोबरच विकास आराखड्यातील रस्त्यांची कामेही सुरू आहेत. ही कामे करताना भूसंपादन आणि अतिक्रमणाच्या काही समस्या आहेत. पावसाळ्यापूर्वी ते काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ता खुला करण्यास विलंब होत असेल, तर पावसाळ्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीी योग्य करावा, अशा सूचना आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिल्या.

तसेच मलनिस्सारण वाहिन्या आणि जलवाहिन्यांचे ज्या भागात काम सुरू आहे ते भाग पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी योग्य करावेत.

रस्ते खोदून मातीचे ढिगारे दिसत असल्याचे चित्र शहरात पाहायला नको, असेही आयुक्त म्हणाले. दिशादर्शक फलक, योग्य बॅरिकेडिंग, पर्यायी मार्ग दर्शविणारे फलक, रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डनची उपस्थिती याबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे आयुक्तांनी बजावले.


हेही वाचा

मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार

मलबार हिलमधील पार्किंगची समस्या मार्गी लागणार

पुढील बातमी
इतर बातम्या