मस्तच! सिंधुदुर्गात उभं राहणार ताजचं फाईव्हस्टार हाॅटेल

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि हॉटेल ताज (Hotel Taj) यांच्यामध्ये मौजे शिरोडा वेळागर (जि. सिंधुदूर्ग) येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या जमिनीवर हाॅटेल ताजच्या माध्यमातून एक पंचतारांकीत हाॅटेल उभारण्यात येईल. ही जमीन ९० वर्षांच्या भोडपट्ट्याने देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णयानुसार मौ. शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता मे. इंडियन हॉटेल्स प्रा. लि. (ताज ग्रुप) यांना संपादीत केलेली व शासकीय जमीन मिळून एकूण ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याकरिता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मे. इंडियन हॉटेल प्रा. लि. (ताज ग्रुप) यांच्यामध्ये लीज डीड व सब लीज डीड हे दोन करार करण्यात आले.

बाजूच्या गोवा राज्यात अनेक पंचतारांकित प्रकल्प, हॉटेल्स, रिसॉर्ट अस्तित्वात आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि.(ताज ग्रुप) ही एक नामांकित संस्था असून त्यांच्यामार्फत कोकणामध्ये प्रथमच पंचतारांकित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि. (ताज ग्रुप) हे पहिल्या टप्पात १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या प्रकल्पामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात देशी व परदेशी पर्यटक आकर्षित होतील. तसेच यामुळे रोजगार निर्मिती व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. याबरोबरच ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यामध्येही यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.

हेही वाचा- मोदी सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं?- उद्धव ठाकरे

ताडोबातील वाघ, राज्यातील विविध समुद्रकिनारे, जंगल, गडकिल्ले हे राज्याचं भांडवल आहे. आपण जगासमोर हे चांगल्या पद्धतीने मांडलं पाहिजे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणं आवश्यक असून त्यासाठी राज्य शासनामार्फत प्रोत्साहन दिलं जाईल. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देणं ही अभिनव कल्पना आहे. लॉकडाऊनच्या काळात पर्यटन बंद असले तरी कोरोनाचं संकट संपल्यानंतर या व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल. ताज हॉटेलने कोकणात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केल्याने कोकणातील वैभवाची जगाला ओळख होईल. राज्याच्या इतर भागातही अशा विविध प्रकल्पांना शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्यात पर्यटन विकासासाठी शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केलं जाईल. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात यावा. तसंच या प्रकल्पासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात यावा. राज्यातील कोस्टल रोडसाठी केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु. तसंच पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे, असे ते म्हणाले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पुढील ६ महिन्यात राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा अधिकाधिक राहील यासाठी प्रयत्न करु. पर्यटन विभागामार्फत यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येत असून कोरोना संकटानंतर राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत हॉटेल व्यवसायासाठी परवानग्यांची संख्या कमीतकमी करण्याचा प्रयत्न आहे. एमटीडीसी आणि ताज हॉटेलच्या समन्वयातून कोकणात साकारत असलेल्या पर्यटन प्रकल्पातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा- पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या उपक्रमांना मंजुरी देणार नाही- उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या