Advertisement

मोदी सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं?- उद्धव ठाकरे

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्या विरोधात लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे, असं रोकठोक मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलं.

मोदी सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं?- उद्धव ठाकरे
SHARES

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्या विरोधात लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. नाहीतर आपण रोज भेटून अशाच चर्चा करत राहू. मात्र आपल्याला लढायचं असेल तर ते कोणत्याही किंमतीत केलं पाहिजे, असं रोकठोक मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलं. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बुधवार २६ आॅगस्ट रोजी संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. (maharashtra cm uddhav thackeray attend meeting with congress president sonia gandhi)

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थिती यासोबतच लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

केंद सरकारच्या धोरणावर टीका करताना या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या स्थितीत देश केवळ एकाच व्यक्तीच्या हातात असल्याचं दिसतं, मग राज्य सरकारांचा काय उपयोग? आपण राज्यघटनेला मानणार नसू तर लोकशाही कुठे आहे? पंतप्रधान आणि राज्य सरकार निवडणारी लोकं सारखीच आहेत. आपण जसे लोकप्रतिनिधी आहोत, तसे ते देखील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहेत. पण आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य हे सहन करता कामा नये. जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणं आपलं कर्तव्य आहे.

हेही वाचा - रोगापेक्षा इलाज भयंकर- उद्धव ठाकरे

उद्धवजी, तुम्ही कोरोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगताच, मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

राज्यातील लॉकडाऊन शिथिल केला जात असतानाही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कारण अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आहेत. आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

जीएसटीच्या मुद्द्यावर केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. केंद्र सरकार केवळ त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या पक्षांना मदत करत असून इतर राज्यांना ठेंगा दाखवत असल्याचा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला. त्यावर आपण केंद्र सरकारकडे एक योग्य प्रोगाम घेऊन गेलं पाहिजे, आपण केंद्र सरकारकडे भीक नाही तर आपले हक्क मागत आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा