Advertisement

रोगापेक्षा इलाज भयंकर- उद्धव ठाकरे

कोरोना बरा झालेल्या रुणांशी यंत्रणांनी पुढचा महिनाभर संपर्क साधावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

रोगापेक्षा इलाज भयंकर- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवून रुग्णांवर उपचार करावे. तसंच कोरोना रुग्णावर उपचार करताना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. कोरोना बरा झालेल्या रुणांशी यंत्रणांनी पुढचा महिनाभर संपर्क साधावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. (get in touch after treatment of covid 19 patients says maharashtra cm uddhav thackeray)

ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते. 

या बैठकीला नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्री महोदयांचे सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव, डॉ. प्रदीप व्यास, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर  सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असताना आपल्याला कायम सतर्क रहावं लागणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करंवे. कायम सतर्क राहावं. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे. वारंवार हात धुणं, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसंच सुरक्षित अंतर यावर भर देणं गरजेचं आहे.

हेही वाचा - विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ठाणे, मुंबईला लागून आहे. गेले काही महिने सातत्याने कोरोनावर लक्ष दिलं गेलं. परंतू आता आपल्याला इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. याशिवाय आगामी काळात विविध धर्मियांचे सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

दिवसेंदिवस कोरोनाची लक्षणे बदलत आहेत. लक्षणे विरहीत रुग्णांवर बारकाईने लक्ष द्यावं. यंत्रणेचं तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. पोलिस व महानगरपालिकांनी ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहीम प्रभावीपणे राबवावी. रुग्णाला व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सिजनची व्यवस्था करावी. कोरोना उपचाराबाबत  शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी. सर्व मनपांच्या मागे शासन ठाम व खंबीरपणे उभं आहे. मात्र प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक मनपाने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करावं, असं त्यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर औषध नाही म्हणून लोक घाबरत आहेत. डॉक्टर-रुग्ण-औषधे यांची गाठ वेळेत होणं आवश्यक आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि योग्य उपचार यांचा वापर करावा. जनतेमध्ये कोरोनाविषयी आजही गैरसमज आहेत. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करुन हे संक्रमण नियंत्रणात ठेवायचं आहे. प्रयत्न करताना स्वत:ची व कुटुंबाचीही काळजी घ्या, असंही शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.

हेही वाचा - डोंबिवलीच्या रस्त्यावरून एक फेरफटका मारून दाखवा, मनसेच्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा