'मेट्रो-३' च्या १.२४ किलोमीटर अंतराचं भुयारीकरण पूर्ण

कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या तेराव्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. विधानभवन मेट्रो स्टेशनजवळ ‘सूर्या २’ हे टनेल बोअिरग मशीन (टीबीएम) शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास भुयारातून बाहेर आलं. या यंत्राद्वारे कफ परेड ते विधानभवन स्थानक या १.२४ किलोमीटर अंतराचं भुयारीकरण पूर्ण झालं आहे.

२०५ दिवसांत टप्पा पूर्ण

कफ परेड स्थानकापासून या भुयारी टप्प्याची सुरुवात झाली असून २०५ दिवसांत हा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. कफ परेड येथे खोदलेल्या विवरात ६०० मेट्रिक टन वजनाचे ‘सूर्या २’ हे टीबीएम उतरवण्यात आले होते. त्याची लांबी ९५ मीटर इतकी आहे. दिवसाला ७ रिंग्ज या वेगानं भुयारीकरणाचं काम या यंत्राद्वारे करण्यात आलं आहे. तब्बल २०५ दिवसांनंतर हे भुयार शुक्रवारी सकाळी पूर्ण झाले.

८३८ रिंग्सचा वापर

भुयारीकरणाच्या तेराव्या टप्प्यासाठी एकूण ८३८ रिंग्सचा वापर करण्यात आला होता. या भुयाराच्या कामामुळं ‘पॅकेज १’ मधील ५.८९ किलोमीटरपैकी २.४८ इतके भुयारीकरण पूर्ण झाल्याची माहिती मिळते. त्याशिवाय, चर्चगेट स्थानकाबाहेर मेट्रोचे काम सुरू असून, त्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास छोटासा स्फोट करण्यात आला होता. त्यावेळी सर्व वाहनं, पादचाऱ्यांना थांबवण्यात आलं होतं. खोदकाम करताना लागलेला कठीण खडक यंत्राद्वारे फोडणं कठीण होतं. त्यावेळी लहान स्वरूपाचा नियंत्रित स्फोट करण्यात आला होता.


हेही वाचा -

अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ५२०० जागा वाढल्या

पुढच्या ४८ तासांत मुंबईतील तापमान वाढण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या