आजारी पडलो किंवा कुठे जखम झाली तर आपण दवाखान्यात नाहीतर हॉस्पिटलमध्ये पहिली धाव घेतो. पण तुम्ही कधी जखमी चपलांच्या हॉस्पिटलमध्ये गेला आहात का? जखमी चपलांचं हॉस्पीटल हा काय प्रकार आहे? चपलांचा पण डॉक्टर असतो का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.
आम्ही बोलत आहोत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोविषयी. तुमच्या देखील नजरेत हा फोटो आला असेल. या फोटोत एक मोची दिसत आहे आणि त्याच्या मागे लावलेल्या बॅनरवर 'जखमी जुतों का हस्पताल' हे नाव पहायला मिळत आहे. त्याच्या खाली 'डॉ. नरसीराम' असं लिहिण्यात आलं आहे. ही मार्केटिंग स्टाईल अनेकांना भावली आणि हा फोटो प्रचंड व्हायरल झाला.
एवढंच नाही तर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना देखील नरसीराम यांची अनोखी स्टाईल भारी आवडली. त्यांनी ट्विटरवरून नरसिराम यांचं कौतुक केलं. दुकानाचं नाव जखमी जुतों का हस्पताल आणि स्वत: च्या नावापुढे डॉक्टर लिहिण्यामागं भन्नाट मार्केटिंग डोकं असावं असं त्यांना वाटलं. त्यानंतर नरसीराम यांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळला असून नरसीराम यांना नवीन दुकान थाटून दिलं आहे.
हा फोटो व्हायरल होताच आनंद महिंद्रा यांनी नरसीराम यांचा शोध घेतला. त्यांना काही मदत हवी आहे का विचारलं. तेव्हा नरसीराम यांनी फक्त एका चांगल्या दुकानाची मागणी केली होती. त्यानुसार आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या टीमवर याची जबाबदारी सोपवली. त्यांच्या कंपनीच्या टीमनं तात्काळ कामाला सुरुवात करून तीन महिन्यात हे दुकान तयार केलं.
नरसीराम यांच्या रस्त्यावरील छोट्या दुकानाचं रुपांतर आता शानदार दुकानात झालं आहे. महिंद्र अॅण्ड महिंद्रच्या टीमनं बनवलेलं दुकान हे छोटसं आहे. पण यात सर्व सुविधा आहेत. या छोट्याशा दुकानात बसण्यासाठी दोन फोल्डिंग टेबलची देखील सोय केली आहे. ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून छत्री देखील देण्यात आली आहे. एका मोचीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत.