माहिम कॉजवेजवळची मांजरींची अजब दुनिया!

श्वानांसोबतच माणसाच्या घरात घरोबा करुन राहणाऱ्या पाळीव प्राण्यांमध्ये मांजर मोठ्या प्रमाणात आढळते. दिवाणखान्यात, सोफ्यावर, बाल्कनीतल्या कट्ट्यावर आरामात बसलेल्या मांजरी अनेक वेळा आपण पाहतो. पण माहीम कॉजवेजवळ राहणारे अब्दुल जब्बार यांनी मात्र मांजरींची स्वतंत्र व्यवस्थाच केली आहे. 

अब्दुल जब्बार यांचं शॉप घराजवळच आहे. या शॉपमध्ये ते लाकडाचे देव्हारे बनवून विकतात. यांच्या लाकडी देव्हाऱ्यात देवासारख्या मांजरी विराजमान झालेल्या असतात. हे शॉप म्हणजे या २५ मांजरींचं एकप्रकारे घरच झालं आहे.

अब्दुल जब्बार ३൦ वर्षांपासून मांजरींचा सांभाळ करत आहेत. त्यांना जब्बारभाई बिल्लीवाले या नावानंही परिसरात ओळखले जाते.

माझ्या वडिलांना रस्त्यावर एक मांजर सापडली होती. त्या मांजरीची अवस्था खूप वाईट होती. वडिलांनी तिला घरी आणलं आणि तिची चांगली देखभाल केली. त्यानंतर मांजरांची काळजी घेणं ही आमच्या कुटुंबियांची परंपरा झाली. कित्येक जणांनी माझ्या घरासमोर मांजरी सोडल्या आहेत. या मांजरींचा मी आणि माझे कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहोत.

- अब्दुल जब्बार

जब्बारभाई जवळपास ४൦ टक्के उत्पन्न मांजरींच्या खाण्यावर आणि औषधांवर खर्च करतात. अंदाजे १५൦൦ ते २൦൦൦ रूपये जब्बारभाई मांजरींवर खर्च करतात.


मी त्यांना सकाळी आधी चिकन आणि त्यानंतर दूध देतो. दुपारी आणि रात्री कॅटफूड खायला देतो. खारमधल्या पशुचिकित्सा दवाखान्यात त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात.

- अब्दुल जब्बार

सेंट मायकल चर्चसमोरच जब्बारभाईंचं शॉप आहे. तुम्ही कधी माहीम कॉजवेजवळून जाणार असाल, तर जब्बारभाई बिल्लीवाले यांच्या शॉपला नक्की भेट द्या. तुम्ही नक्कीच या मांजरींच्या प्रेमात पडाल.

पुढील बातमी
इतर बातम्या