१०० च्या नवीन नोटेवरील 'राणी की वाव'ची रंजक गोष्ट

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १०० रुपयांची नवी नोट लवकरच चलनात येणार आहे. या नव्या कोऱ्या नोटेचा फोटो नुकताच सादर करण्यात आला. या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. यामध्ये एका बाजूला इतर नोटांप्रमाणे महात्मा गांधी यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातच्या  'राणी की वाव' या ऐतिहासिक स्थळाचा फोटो आहे. पण  'राणी की वाव' म्हणजे काय? याचा काय इतिहास आहे? यासंदर्भातल्या काही रंजक गोष्टी आम्ही सांगणार आहोत. 

ऐतिहासिक 'राणी की वाव'

गुजरातमधील पाटण इथं  'राणी की वाव' आहे. वाव म्हणजे विहीर. गुजरातमधल्या ज्या भागात पाण्याची टंचाई होती अशा ठिकाणी तत्कालीन राजांनी खूप खोल अशा विहिरी खोदून घेतल्या. अकराव्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढ्य घराण्याचं राज्य होतं. आजचं पाटण हे गाव त्याकाळी सोळंकी साम्राज्याची राजधानी होती. सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी राणी उदयमती यांनी गावात शिल्पसमृद्ध विहिरींची निर्मिती केली. ही विहीर ९०० वर्षे जुनी आहे.

शिल्पकलेचा उत्तम नमुना

 'राणी की वाव' ही सात मजली खोल विहीर आहे. सुडौल आणि भरपूर मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. गणपती, शिव, चार हातांचा मारुती, विष्णूचे दशावतार अशा असंख्य मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. याशिवाय नृत्यांगना-अप्सरा यांच्याही मूर्ती इथं आहेत. या विहिरी खोल असल्यामुळे त्यात जाण्यासाठी जिन्यांची सोयदेखील करण्यात आली होती.

ऐतिहासिक दर्जा

२०१४ साली या जागेला युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिला. कधीकाळी या ठिकाणी अनेक पर्यटक भेट द्यायचे. पण २००१ पासून पर्यटकांसाठी विहीर बंद करण्यात आली. भुज इथं आलेल्या भुकंपामुळे विहिरीच्या काही भागाला धक्का बसला. त्यामुळे काही मजले बंद ठेवण्यात आले.  


हेही वाचा -

मुंबईचे गांधीतीर्थ म्हणजे 'मणिभवन'!


 

पुढील बातमी
इतर बातम्या