हा खेळ बाहुल्यांचा

आदिम काळात जेव्हा मनोरंजनाची साधनेच नव्हती. तेव्हा कल्पनेला वाव देत एक संपन्न कला बहरली होती. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जाळ्यात ही कला इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. ही कला म्हणजे कळसूत्री बाहुल्यांची परंपरा किंवा चित्रकथी.

परंपरा जपण्याचा प्रयत्न

ही परंपरा ख्रिस्तपूर्व ५००० पर्यंत अगदी महाभारत काळापर्यंत आपल्याला मागे घेऊन जाते. आपल्याकडे राजस्थान, कोकणात पडद्यावर सावल्या पाडून बाहुल्यांचे, प्राण्यांचे खेळ करण्याची प्रथा आहे. काठीवर नाचवली जाणारी 'रॉड पपेट' किंवा हातावर चालवणारी 'हॅण्ड पपेट' म्हणतात. अशा बाहुल्यांची परंपरा लोप पावत चालली आहे. पण मुंबईतील एक ग्रुप असा आहे जो ही पारंपरिक कला आणि ऐतिहासिक ठेवा आजही जपण्याचा प्रयत्न करत आहे.

लोक कलेला पुन्हा भरारी

बाहुल्यांच्या हालचालींतून एखादा नाट्य-प्रसंग प्रेक्षकांसमोर उभा करण्याचा एक प्राचीन काळापासून चालत आलेला खेळ. या खेळात सूत्राच्या आधारे बाहुल्यांच्या हालचालींचं नियमन करणारा सूत्रधार स्वत: अदृश्य राहून या बाहुल्याच जणू स्वयंप्रेरणेनं हालचाल करत आहेत, असे भासवतो. कळसूत्री बाहुल्यांचे हे नाट्य सूत्रधाराच्या कल्पनेवर अवलंबून असते.

सोशल मीडियाच्या जाळ्यातही लोप पावत चाललेल्या कलेला उभारी देण्याची जबाबदारी 'द पपेटरियन्स' या ग्रुपनं घेतली आहे. संग्या ओझा आणि हासीम हैदर या दोघांनी या ग्रुपची सुरुवात केली. लोकांचं मनोरंजन करण्यासोबतच पपेट्सचा प्रचार करण्यासाठी त्यांनी 'द पपेटरियन्स' हा ग्रुप सुरू केला.

हा ग्रुप सर्व प्रकारचे पपेट्स शो सादर करतो. छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली आणि सूत्र बाहुली अशा प्रकारांमध्ये पपेट्स शो सादर करतो.

१) छाया बाहुली

या प्रकारात रंगीत कागद, कचकडी, पातळ कातडे अशा मितपारदर्शक पदार्थांचा वापर केला जातो. यासाठी प्रथम कातडे दोन्ही बाजूंनी स्वच्छ करतात. त्याचे पातळ थर एकमेकांपासून अलग करून धड, डोळे, अवयव असे सुटे भाग कापतात. 

पांढरा पडदा आणि प्रखर दिवा यांच्यामध्ये पडद्याला लावून काड्यांच्या साहाय्यानं बाहुलीची हालचाल करतात. याला संगीत आणि संभाषणाची जोड देऊन कळसूत्री नाट्य तयार होते.

हात-बाहुली

हात मोज्याप्रमाणे हाताच्या पंजावर बसवून रंगमंचाच्या मागे उभं राहून हिची हालचाल करता येते. कापदाचा रांधा, कापड अशा हलक्या पदार्थांपासून बाहुलीचे डोळे आणि पंजे तयार करून मऊ कापडाच्या तीन तोंडी पिशवीला ते घट्ट बसवण्यात येतात. त्यानंतर बाहुलीला कपडे आणि दागिने घातले जातात.

कळसूत्री बाहुली (कठपुतली)

रंगमंचाच्या मागे किंवा वर उभं राहून ही कला चालवली जाते. छाती, पोट, कंबर, डोके, हात आमि पाय असे सुटे भाग तयार करून हालत्या सांध्यांनी ते जोडतात. योग्य ठिकाणी दोरे बांधून बाहुलीची हवी तशी हालचाल करता येते.

तुम्हाला शिकायचीय प्राचीन कला?

शाळेमध्ये देखील त्यांनी अनेक पपेट्स शो सादर केले आहेत. यामध्ये ते मुलांना कसं वागायचं, राहायचं, मैत्री, कुटुंब यासर्व गोष्टींसंदर्भात माहिती देतात. याशिवाय तरूणांसाठी ते वर्कशॉप देखील घेतात. यात पपेट्सचे कॅरेक्टर्स कसे बनवायचे यापासून ते पपेट्स शो कसे करायचे? हे सर्व शिकवलं जातं.

तुम्हाला सुद्धा कळसूत्री शिकण्याची आवड असेल, तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी त्यांच्या  http://www.thepuppetarians.com/showcase.php वेबसाईटला भेट द्या किंवा +919967862861 या नंबरवर संपर्क साधा.


हेही वाचा-

हा खेळ सावल्यांचा...शॅडो पपेट्सची अनोखी कला!


पुढील बातमी
इतर बातम्या