अखेर ‘रमाई’च्या रूपात अवतरणार वीणा!

गत वर्षी ‘मुंबई लाइव्ह’नं एक एक्सक्लुझीव्ह बातमी दिली होती. ‘रमाई’च्या रूपात भेटणार ‘लालबागची राणी’ या ब्रेकिंग न्यूजमध्ये अभिनेत्री वीणा जामकरनं रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारल्याचं म्हटलं होतं. वीणानं साकारलेली ‘रमाई’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १२ एप्रिलपासून हा चित्रपट महाराष्ट्राच्या काही भागात प्रदर्शित होत आहे.

भूमिकेतून आदरांजली 

‘रमाई’ प्रदर्शित होत असल्याची माहिती ‘मुंबई लाइव्ह’ला देताना वीणा म्हणाली की, ‘रमाई’ हा माझ्या आजवरच्या कारकिर्दीपैकी एक महत्त्वाचा चित्रपट आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्याची संधी लाभल्यानं मी खूपच आनंदी आहे. आपण साकारलेली एखादी विशेष व्यक्तिरेखा जेव्हा प्रेक्षकांसमोर येणार असते, तेव्हा कुतूहलही असतं आणि उत्साहही. ‘रमाई’ प्रदर्शित होत असताना माझ्या मनात नेमकी हीच भावना आहे. मराठी प्रेक्षक सुजाण आहेत. ‘रमाई’ सादर करण्याचा आमच्या टिमच्या या प्रयत्नाचं ते नक्कीच कौतुक करतील अशी आशा आहे.

चाहत्यांशी संवाद 

वीणानं फेसबुकच्या माध्यमातूनही आपल्या चाहत्यांशी संवाद साधत ‘रमाई’ प्रदर्शित होत असल्याचं सांगितलं आहे. वीणानं लिहीलं आहे की, उद्या माझा रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'रमाई' चित्रपट प्रदर्शित होतोय! दीर्घ प्रतिक्षेनंतर... महापुरुषांच्या आणि स्त्रीयांच्या आयुष्याचा संघर्ष त्यांच्या मृत्यूनंतरही संपत नाही...! रमाबाई आणि त्यांची भूमिका साकारणारी मी… वाट बघणं आणि पदरात पडेल ते गोड मानून घेणं एवढंच आपल्या हाती असल्याचं म्हणत वीणानं ‘रमाई’चं पोस्टरही शेअर केलं आहे.

धाडस आणि परिश्रम

निर्माते प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, चंद्रकांत खरात यांनी एनएमई म्हणजेच न्यू मैत्री एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली मोठ्या धाडसानं आणि परिश्रमानं ‘रमाई’ची निर्मिती केल्याचंही वीणा म्हणाली. बाळ बरगाले यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. डाॅ. अरुण मिरजकर यांनी या चित्रपटाचं संवादलेखन केलं असून, प्रा. गोपाल कबनुरकर, प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी गीतलेखन केलं आहे. संगीतकार मधु-कृष्णा आणि अप्रल रोमन यांनी संगीत दिलं आहे. आनंद शिंदे, साधना सरगम, रविंद्र साठे, नंदेश उमप, विजय सरतापे या गायकांनी ‘रमाई’साठी गायन केलं आहे. या चित्रपटात वीणासोबत सागर तळाशीलकरनं बाबासाहेबांची भूमिका साकारली आहे. याशिवाय अरुण नलावडे, सोनल शिंदे आणि बऱ्याच नवोदित कलाकारांचा यात समावेश आहे.


हेही वाचा-

'स्टेपनी' घेऊन आला भरत

मोहन जोशी शिकताहेत ६६वी कला


पुढील बातमी
इतर बातम्या