काही कलाकार अपरिचीत भाषेतही धडाकेबाज कामगिरी करत कौतुकास पात्र ठरत असतात. अंकीत मोहन या अभिनेत्यानंही केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर ‘फर्जंद’ या सिनेमात शीर्षक भूमिका साकारत शाबासकी मिळवली होती. याच अंकीतनं स्वराज्यातील ढाण्या वाघ बनत चक्क दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे.
दमदार अभिनय, भरदार शरीरयष्टी आणि जबरदस्त अॅक्शन स्टंट या त्रिसूत्रीच्या जोरावर 'अंकित मोहननं ‘फर्जंद’ चित्रपटातून सर्वांची मनं जिंकली होती. आता ‘फत्तेशिकस्त’ या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना अंकितच्या अभिनय आणि अॅक्शनची जादू अनुभवयाला मिळणार आहे. शिवकाळातील शूर आणि विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या येसाजी कंक ही महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अंकितनं खूप मेहनत घेतली आहे. येसाजी कंक यांना ‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळखलं जातं. मदमस्त हत्तीलाही आपल्या शौर्यानं काही क्षणांत लोळवणाऱ्या येसाजी कंक यांचं स्वराज्यनिर्मितीत बहुमूल्य योगदान राहिलं असल्याची माहिती इतिहासात आहे.
पिळदार शरीरयष्टी असलेल्या अंकितला अॅक्शनची प्रचंड आवड असल्यानं चित्रपटातील अॅक्शन्स सीन करण्यासाठी तो नेहमीच आग्रही असतो. यातील एका सीनसाठी तर अंकितनं चक्क दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत तो सीन पूर्ण केला. त्याचा हा धाडसी शॉट बघून सगळेजण थक्क झाले. आपल्या या भूमिकेबद्दल अंकित म्हणाला की, कोंडाजी फर्जंदच्या यशानंतर येसाजी कंक यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल, अशी आशा आहे.
हेही वाचा -
'अशी ही बनवाबनवी'ची ३१ वर्ष, आजही हे १० डायलॉग प्रेक्षकांना हसवतात
सूनबाई येती घरा, तोची दिवाळी दसरा