मराठी भाषेमध्ये येणारे दर्जेदार चित्रपट, उत्कृष्ट कथानक यामुळे बॉलिवूडही आता मराठी चित्रपटांकडे आकर्षित होऊ लागलं आहे. अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अजय देवगण यानंतर आता निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शनने आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवला आहे. करण जोहर माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट'बरोबर जोडला गेला आहे.
माधुरी दीक्षित आणि करण जोहर यांनी ही माहिती ट्वीटरवरून प्रेक्षकांना दिली. ट्वीटरवर माधुरीने एक पोस्टरही शेअर केलं आहे. बकेट लिस्ट प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये याची बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित सोबत सुमित राघवन, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, इला भाटे, प्रदीप वेलणकर आणि रेणुका शहाणे दिसणार आहेत. तब्बल २३ वर्षानंतर माधुरी आणि रेणुकाची जोडी एकत्र दिसणार आहे.
'बकेट लिस्ट..माझी तुमची..आपली सगळ्यांची' अशी आकर्षक टॅगलाईन या चित्रपटाची आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. 'बकेट लिस्ट' या चित्रपटाची कथा आयुष्यात अपुरी स्वप्ने घेऊन जगणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची आणि कुटुंबाची कथा आहे. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट साऱ्यांनाच प्रेरित करेल असा आहे.
बकेट लिस्टच्या माध्यमातून एका उत्तम संहितेचा आणि चांगल्या कलाकृतीचा भाग होता आले, याचा मला आनंद आहे. माझ्या वाढदिवसाच्या महिन्यातच हा चित्रपट सादर करण्याची घोषणा करून करण जोहरने मला अतिशय सुंदर भेट दिली आहे.
माधुरी दीक्षित, अभिनेत्री
हेही वाचा