रेमो डिसुझाची 'गावठी' स्टाईल!

नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसुझा व्हॅलेन्टाईन डे निमित्ताने सगळ्यांना एक भन्नाट सरप्राईझ देणार आहे. मात्र यावेळचं त्याचं हे सरप्राईझ 'गावठी' स्टाईलमध्ये असणार आहे!

काय आहे सरप्राईझ?

‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी 2’ या चित्रपटांसाठी रेमोसोबत सहाय्यक दिग्दर्शक असणारे आनंदकुमार (ॲन्डी) यांचा ‘गावठी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या संगीत आणि पोस्टर अनावरणाला रेमो उपस्थित राहणार आहे. यावेळी रेमो फक्त उपस्थितच राहणार नाही, तर 'गावठी' या सिनेमातील ‘दिसू लागलीस तू’ या गाण्यावर तो थिरकणार देखील आहे!

प्रमोशनसाठी अॅन्डीची दोस्तमंडळी सरसावली!

रेमोसोबतच डान्स मास्टर पुनीत, धर्मेश, राघव आणि शक्ती मोहन ही ॲन्डीची दोस्तमंडळी ‘गावठी’च्या प्रमोशनसाठी सरसावली आहेत. अश्विन भंडारे आणि श्रेयस आंगणे या संगीतकारांनी रचलेलं 'गावठी' या चित्रपटातील रोमॅन्टिक गाणं प्रेक्षकांसाठी व्हॅलेन्टाईन स्पेशल गिफ्ट ठरणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, नागेश भोसले, कुशल बद्रीके, किशोर चौघुले, वंदना वाकनीस हे प्रमुख कलाकार आहेत.

काय आहे सिनेमाची कथा?

ग्रामीण, अशिक्षित आणि अपरिपक्व विचारांच्या, गचाळ राहणाऱ्या व्यक्तीला गावठी म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गावठी संबोधल्याने त्याच्यात एक प्रकारचा न्यूनगंड येतो. चांगल्या कपड्यातील फाडफाज इंग्रजी बोलणारी शहरातील माणसं पाहिली की मातृभाषेत बोलणाऱ्या शहरी माणसांनाही तुलनेनं आपण गावठी असल्याचं भासत राहतं. मग ग्रामीण लोकांची काय तऱ्हा होत असेल? पण, अशाच गावठी म्हणून हिणवल्या गेलेल्या व्यक्तींची बुद्धीमत्ता कमी नसते, कमी पडतो तो त्यांचा आत्मविश्वास! तेव्हा हाच गावठी शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा विषय मांडणारा 'गावठी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा

माधुरी बनली सुपरबाईक रायडर!

पुढील बातमी
इतर बातम्या