युथट्यूब'द्वारे निर्मितीकडे वळले मधुराणी-प्रमोद

काही कलाकार-दिग्दर्शक केवळ अभिनय किंवा चित्रपटांच्या दिग्दर्शनाच्या मागे न धावता आपल्याला जे येतं ते पुढील पिढीला देण्यासाठी कार्यरत असतात. यात दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांचाही समावेश आहे. कलाकार-तंत्रज्ञ घडवण्याचं काम करणाऱ्या या जोडप्यानं आता निर्मिती क्षेत्रात उतरत 'युथट्यूब' हा सिनेमा बनवला आहे.

'गोड गुपित', 'ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे', 'सुंदर माझं घर' या चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर प्रमोद आता 'युथट्यूब' असं शीर्षक असलेला मराठी सिनेमा घेऊन आला आहे. शीर्षकावरूनच हा सिनेमा युथफूल असल्याची जाणीव होते. आपल्या अभिनय शाळेत शिकणाऱ्या मुलांना या सिनेमात ब्रेक देण्यासाठी प्रमोदने पत्नी मधुराणीसोबत प्रथमच चित्रपटाची निर्मितीही केली आहे.

१ फेब्रुवारीला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

प्रमोद-मधुराणीचा 'युथट्यूब' हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलेचं माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण होणे गरजेचं असतं. कलेच्या बाबतीत हे सातत्याने घडणं आवश्यक असतं. नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ घडत जातात, तेव्हाच सर्जनशीलतेला वाव मिळत असतो. याच विचारसरणीतून प्रमोद आणि मधुराणी यांनी मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीची स्थापना केली. अनेक उत्तम कलाकार या अकॅडमीच्या माध्यामतून प्रकाशझोतात आले. त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचं काम प्रमोद-मधुराणी यांनी नेटानं केलं आहे.

३०० विद्यार्थ्यांचा अभिनय

'युथट्यूब' या चित्रपटातही त्यांनी ३०० विद्यार्थ्यांना कॅमेरा फेस करण्याची संधी दिली आहे. एकाच अक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असून, मनोरंजनसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असावं. आजकाल फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस अॅप हे तर आपल्या कुटुंबाचं सदस्य झालेत. हल्ली आपण घरातल्यांसमोर किती व्यक्त होतो माहित नाही, पण सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यक्त होतोच. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सद्सदविवेक बुद्धीचा विसर पडत कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. हाच धागा पकडून 'युथट्यूब' चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे.


हेही वाचा -

समीतने जुळवले ’३६ गुण’

'मणिकर्णिका'मध्ये मराठी रंगभूषाकाराची जादू!


पुढील बातमी
इतर बातम्या