दिग्पाल देणार 'फत्तेशिकस्त'!

लेखक-अभिनेता दिग्पाल लांजेकरनं दिग्दर्शनात पदार्पण करतानाच ‘फर्जंद’सारखा ऐतिहासिक चित्रपट बनवत प्रेक्षकांपासून परीक्षकांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आता पुन्हा एकदा इतिहासाची पानं उलगडत दिग्पाल 'फत्तेशिकस्त' चित्रपट बनवत आहे.

कुशल युद्धनीतीचं दर्शन 

‘फर्जंद’च्या यशानंतर दिग्पालनं सावरकरी विचारधारेचं दर्शन घडवणाऱ्या ‘चँलेंज’ आणि ‘हे मृत्युंजय’ ही नाटकं मराठी रंगभूमीवर आणली. त्यानंतर मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी तो काय बनवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आता याचं उत्तर मिळालं आहे. दिग्पाल पुन्हा एकदा इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडणार आहे. ‘फर्जंद’मध्ये कोंडाजी फर्जंदनं गाजवलेल्या पराक्रमाची गाथा तरुणाईसमोर सादर केल्यानंतर दिग्पाल आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचं दर्शन घडविणारा 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट बनवत आहे. 

पन्हाळगडावर मुहूर्त 

कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच पन्हाळगडावर या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. मुहूर्तानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरुवातही करण्यात आली. कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समज, दूरदृष्टी, कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवर मोठ्या चलाखीनं चढाया करत प्रत्येक मोहिम फत्ते केली. 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. 

अनुप सोनी मराठीत

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर आदी कलाकारांच्या भूमिका 'फत्तेशिकस्त'मध्ये पाहायला मिळणार आहेत. याशिवाय हिंदीतील अनुप सोनी या चित्रपटाद्वारे मराठीत दाखल होत आहे.


हेही वाचा -

Movie Review : राजकारणाच्या पटलावर फुटलेला प्रेमाचा 'कागर'


पुढील बातमी
इतर बातम्या