Advertisement

Movie Review : राजकारणाच्या पटलावर फुटलेला प्रेमाचा 'कागर'


Movie Review : राजकारणाच्या पटलावर फुटलेला प्रेमाचा 'कागर'
SHARES

आजवर बऱ्याच प्रेमकथांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यातल्या त्यात ट्रॅजिक एंड असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती लाभली आहे. 'रिंगण' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर 'यंग्राड'मध्ये तितकीशी कमाल दाखवू न शकलेल्या दिग्दर्शक मकरंद माने यानं 'कागर'मध्ये प्रेम आणि राजकारणाचा डाव मांडला आहे. लेखन पातळीवर हा डाव सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असला तरी इतर विभागांमधील ढिसाळ कामगिरीचा फटका चित्रपटाला बसल्याचं जाणवतं. राजकारणाच्या पटलावर फुटलेला प्रेमाचा 'कागर' असंच या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल.

रिंकूच्या ग्लॅमरची जोड

'कागर' शब्दाचा अर्थ सर्वांनाच ठाऊक असेल असं नाही. सोलापूरकडच्या ग्रामीण बोलीभाषेतील या शब्दाचा अर्थ 'अंकुर' असा आहे. कथानकाशी एकरूप होणारं शीर्षक या चित्रपटाला आहे. जेव्हा एखादा कलाकार-तंत्रज्ञ राष्ट्रीय पुरस्काराला पटकावतो, तेव्हा त्याच्या आगामी चित्रपटाकडून अपेक्षा खूप वाढतात. या चित्रपटात मात्र त्या पूर्ण होत नाहीत. 'सैराट'मुळं वन नाईट स्टार बनलेल्या रिंकू राजगुरूच्या ग्लॅमरची जोड या चित्रपटाला देण्याचा प्रयत्न केला आहे, पण प्रथमच नायक साकारणारा शुभंकर तावडेच सरस वाटतो.


गुन्ह्याची कबुली 

चेहरा न दाखवलेल्या एका अज्ञात व्यक्तीपासून या चित्रपटाची सुरुवात होते. ही व्यक्ती पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली देते आणि फ्लॅशबॅकमध्ये राणी (रिंकू राजगुरू) आणि (शुभंकर तावडे) यांची प्रेमकथा सुरु होते. राणी ही विराईनगरच्या राजकारणातील रिमोट कंट्रोल असणाऱ्या गुरूजी (शशांक शेंडे) यांची कन्या, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बलिदान देणाऱ्या पित्याच्या घरी जन्मलेला उच्चशिक्षीत आणि धाडसी तरुण म्हणजे युवराज. भविष्यात राजकारणात ठोस कामगिरी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी युवराज लढा देत असतो. यासाठी तो गुरुजींचा कार्यकर्ता बनून त्यांनी सांगितलेलं कोणतंही काम धाडसानं करतो. युवराजच्या याच धाडसी बाण्यावर राणी फिदा होते. दोघांमध्ये प्रेमांकुर फुटल्याची कल्पना गुरुजींना नसते.


गुरुजी युवराजला भडकवतात

गुरुजींचा एकेकाळचा राजकारणातील गुरू आणि युवराजच्या वडिलांचा मारेकरी आबासाहेब (सुहास पळशीकर) देखील या चित्रपटातील राजकारणातील एक महत्त्वाचा मोहरा. आबासाहेबामुळं आपल्या जीवाला धोका असून, तोच तुझ्या वडिलांचा मारेकरी असल्याचं सांगत गुरुजी युवराजला भडकवतात. त्यानंतर कथेत एक वेगळंच वळण येतं. या वळणावर राणी आणि युवराजच्या प्रेमाचा अंकुर खुडून टाकण्यात राजकारण यशस्वी होतं का ते चित्रपटात पाहायला मिळतं.


लेखन, दिग्दर्शनात त्रुटी 

'तारुण्यात फुलणाऱ्या प्रेमाच्या अलवार नात्याचा अंकुर', असं या चित्रपटाचं वर्णन करण्यात आलंय ते बरोबर आहे. एका वेगळ्या ग्राफची पटकथा मकरंदनं लिहीली आहे, पण त्यात बऱ्याच उणीवा राहिल्यानं चित्रपट प्रभावी वाटत नाही. संजय पवार यांच्या साथीनं मकरंदनं अगदी चपखल संवादलेखनही केलं आहे. असंच काम दिग्दर्शकीय पातळीवरही होण्याची अपेक्षा होती. नायकाच्या पित्याच्या मारेकऱ्याला काहीच धडा मिळत नाही. त्याचा ट्रॅकमधूनच गायब झाला आहे. एखाद्या वाहनावर उजव्या बाजूनं गोळ्या झाडल्यानंतर त्या खिडकीच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला न लागता थेट पलिकडच्या म्हणजेच डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला लागतात यामागील लॅाजिक समजत नाही. यांसारख्या बऱ्याच त्रुटी लेखन आणि दिग्दर्शकीय पातळीवर राहिल्या आहेत.


गुरुजींचा गेटअप अफलातून

कथानकासाठी पोषक असणारी वातावरण निर्मिती आणि ग्रामीण भाषेचा लहेजा यावर मेहनत घेण्यात आली असून, कलाकारांनी त्याची जाण ठेवून आपापली भूमिका साकारली आहे. वास्तववादी लोकेशन्सवर भर देण्यात आला आहे. शशांक शेंडेंनी साकारलेल्या गुरुजींचा गेटअप अफलातून आहे. त्यांच्या पहिल्या सीनमध्ये ते ओळखताच येत नाहीत. आवाज ओळखीचा वाटतो, पण चेहरा अनोळखी दिसतो. ही किमया गेटअपची आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं पार्श्वसंगीत आणि संगीतही चांगलं आहे. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या टायटल ट्रॅकची सुरुवात जात्याच्या आवाजापासून होते, तर शेवट डीजेनं होतो. 


रिंकू ठरली मायनस पॅाइंट

रिंकू राजगुरू ही या चित्रपटाचा हुक पॅाइंट असली तरी तीच मायनस पॅाइंटही ठरली आहे. चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नाहीत की, बोलण्यात चढ-उतार नाही. रिंकू ग्लॅमरस आहे, पण 'सैराट'सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर पाठांतर केल्यासारखी संवादफेक तिच्याकडून अपेक्षित नाही. मकरंदनं तिला 'आर्ची'च्या शैलीतून बाहेर काढण्याची गरज होती, पण कदाचित रिंकूच्या दबावाखाली तो तिच्याकडून आपल्या मनासारखं काम करवून घेऊ शकला नसेल.


शुभंकर रिंकूपेक्षा उजवा 

याउलट शुभंकर तावडेनं मिळालेल्या संधीचं सोनं करत साकारलेला युवराज त्याला भविष्यातील वाटचालीसाठी फायदेशीर ठरणारा आहे. देहबोलीपासून संवादफेकीपर्यंत सर्वच बाबतीत तो रिंकूपेक्षा कितीतरी पटीनं उजवा वाटतो. शशांक शेंडे यांची व्यक्तिरेखा आणि त्यांचा गेटअप आश्चर्यचकीत करणारा आहे. त्यांनी साकारलेले गुरुजी जबरदस्त झाले आहेत. सुहास पळशीकरांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत आबासाहेब साकारले आहेत. भारती पाटील, मिलिंद फाटक, उमेश जगताप, शंतनू गांगणे, विठ्ठल काळे, महेश भोसले यांनीही चांगलं काम केलं आहे.

राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक यांचा चित्रपट असल्यानं कुतूहल म्हणून हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही. मात्र फार अपेक्षा ठेवून जाता कामा नये.

……………………………….

मराठी चित्रपट : कागर

निर्माते : सुधीर कोलते, विकास हांडे

लेखन-दिग्दर्शक : मकरंद माने

कलाकार : शुभंकर तावडे, रिंकू राजगुरू, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, भारती पाटील, मिलिंद फाटक, उमेश जगताप, शंतनू गांगणे, विठ्ठल काळे, महेश भोसले



हेही वाचा -

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचा अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम

पहिल्याच दिवशी 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' ची ११८५ कोटींची कमाई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा