नेहा खानच्या 'शिकारी'मध्ये सुव्रत जोशीही!

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून नावारूपाला आलेला आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’मधून रसिकांच्या मनात आपली वेगळी 'फ्रेम' तयार करणारा अभिनेता सुव्रत जोशी लवकरच ‘शिकारी’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. 'शिकारी' या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

पहिल्या बोल्ड पोस्टरनंतर 'शिकारी' या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. नेहा खानचा बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षक क्लीन बोल्ड झाले. या चित्रपटाच्या टीझरने काही वेळातच लाखोंचा पल्ला गाठला. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ ही टॅगलाईन घेऊन 'शिकारी'चे पोस्टर झळकले. या चित्रपटात नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका आहे. नेहा बरोबरच सुव्रत जोशीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

या दोन्ही कलाकारांसोबतच कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भाऊ कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव हे कलाकारही या चित्रपटात दिसतील. बोल्ड पोस्टर, तगडी स्टारकास्ट यामुळे या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपट रसिकांमध्ये फार उत्सुकता आहे.

सुव्रतबद्दल काही...

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा (एनएसडी) विद्यार्थी असलेला सुव्रत जोशी हा मूळचा पुण्याचा आहे. अनेक मराठी नाटके आणि एकांकिकांमधून सुव्रतने याआधी भूमिका केल्या आहेत. पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यावर त्याने एका प्रख्यात शाळेत एक वर्ष शिक्षकाची नोकरीही केली. एनएसडीमधून परतल्यावर त्याला अभिनयाच्या संधी मिळत गेल्या. नॉट इन फोकस, बिनकामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालिम आणि अमर फोटो स्टुडिओ ही त्याने केलेली नाटके आहेत.


हेही वाचा

'या' चित्रपटासाठी अमेय वाघ वाढवतोय वजन!

पुढील बातमी
इतर बातम्या