झोप उडवणार गिरीश जोशींचा ‘टेक केअर गुड नाइट’

‘टेक केअर गुड नाइट’ म्हणजेच ‘टीसीजीएन’ असं आपण नेहमीच म्हणतो, पण आता असं शीर्षक असलेला सिनेमाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘टीसीजीएन’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यात हा सिनेमा सर्वांची झोप उडवणार असल्याचं म्हटलं आहे.

कधी होणार प्रदर्शित?

सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे या मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा अभिनय आणि लेखक गिरीश जोशींचं दिग्दर्शन ही ‘टीसीजीएन’ची खासियत आहे. हा चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा एका शहरातील कुटुंबाची असून, या कुटुंबानं आपलं स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचं त्यांचं अज्ञान दूर करावं लागतं.

आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडिलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानानं व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.

आणि दिग्दर्शन क्षेत्रात ठेवलं पाऊल

सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसा-माणसांमधील तुटलेला संपर्क हे मध्यवर्ती सूत्र धरून गिरीश जोशी यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसं सिनेमाचं लेखन पूर्ण होत गेलं तसतसा जोशींमध्ये दडलेला दिग्दर्शक आकार घेऊ लागला. जेव्हा चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार झाला, तेव्हा या चित्रपटाचं दिग्दर्शनही करायचा निर्णय घेत गिरीश जोशींनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं.


हेही वाचा - 

स्पृहा जोशी बनली सूत्रसंचालिका!

शाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा

पुढील बातमी
इतर बातम्या