‘काय झालं कळंना’ ला सुमधूर संगीताची किनार

प्रेमवीरांची गोष्ट सांगणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा कलाकार, तंत्रज्ञ, गायक आणि संगीतकारांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रेम... ही सुंदर भावना. कुणाला कळलेली, कुणाला न कळलेली... काहींना सहजपणे स्वर्गसुख देणारी... तर काहींसाठी विरह आणि वेदना देणारी... पहिल्या प्रेमाची तर बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडणाऱ्या ‘काय झालं कळंना’ चं संगीत आता रसिकांसाठी खुलं झालं आहे.

विविध मूड्समधील गीतरचना

प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची जोड दिल्यास ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होते हे लक्षात घेऊनच ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेलाही कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना...’, ‘टकमक टकमक...’, ‘रुतला काटा...’, ‘फुटला टाहो...’, ‘चंद्रकोर...’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीतं या चित्रपटात आहेत.

पंकज पडघमचं संगीत

या सिनेमातील गीतं माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीतकार पंकज पडघन यांनी या गीतांना स्वरसाज चढवला आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांच्या आवाजात ही गीतं स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

नवी कोरी जोडी

या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी कोरी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर यांच्याही भूमिका आहेत.

तरुण निर्मात्याचं आव्हान

श्री धनलक्ष्मी प्राॅडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अवघं २१ वर्षे वय असलेल्या पंकज गुप्ता या तरुणाने केली आहे. दिग्दर्शन आणि कथालेखन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे.


हेही वाचा -

'बिग बॅास'च्या घरात स्मिता घालणार का बिकीनी?

बाळासाहेबांची भूमिका 'लार्जर दॅन लाइफ'- नवाजुद्दीन सिद्दीकी


 

पुढील बातमी
इतर बातम्या