स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार 'फत्तेशिकस्त'

women starcast Mrinal Kulkarni Mrunmayee Deshpande Ruchi Sawant Ashwini Kulkarni in marathi film fatteshikast
women starcast Mrinal Kulkarni Mrunmayee Deshpande Ruchi Sawant Ashwini Kulkarni in marathi film fatteshikast

आजच्या काळातील स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत असल्या तरी काही ऐतिहासिक स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनं इतिहास घडवला आहे हे विसरता येणार नाही. ‘फत्तेशिकस्त’ या आगामी सिनेमात प्रेक्षकांना अशाच स्त्रीशक्तीचं दर्शन घडणार आहे.

स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार 'फत्तेशिकस्त'आजवरच्या बऱ्याच लढायांमध्ये स्त्रियांनीही पुरुषांइतकंच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत. शत्रूची वित्तंबातमी काढण्यापासून, हेरगिरी करण्यापर्यंत आणि त्यांची दिशाभूल करून प्रत्यक्ष लढाईत तलवारबाजी करण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर स्त्रियांनी आपली शक्ती दाखवत शत्रूंना सळो की पळो करून सोडलं आहे. 'फत्तेशिकस्त' सिनेमातही स्त्रीशक्तीचे विविध पैलू पहायला मिळणार आहेत. यापैकी काही स्त्रिया पडद्यावर वावरताना दिसणार आहेत, तर काहींनी पडद्यामागं राहून आपलं कौशल्य पणाला लावत 'फत्तेशिकस्त' पडद्यावर सादर करण्याच्या आव्हानात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

चतुरस्र मृणाल कुलकर्णी या सिनेमात पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर यापूर्वी राजमाता साकारल्यानंतर त्या पुन्हा यात जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सोबत मृण्मयी देशपांडे ‘फुलवंती’ या एका वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पत्नी ‘सोयराबाईं’च्या भूमिकेत रुची सावर्ण दिसणार आहे. आजवर मराठी आणि हिंदी मालिका गाजवणारी रुची 'फत्तेशिकस्त'मधून मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. मोघल साम्राज्याची ‘बडी बेगम’ची तडफदार व्यक्तिरेखा अश्विनी कुलकर्णीनं रंगवली आहे. याखेरीज मोघलांच्या वफादार सरदार ‘रायबाघन’च्या भूमिकेत तृप्ती तोरडमल, तर शाहिस्तेखानाची सून ‘बहूबेगम’च्या भूमिकेत नक्षत्रा मेढेकर दिसणार आहे.

पडद्यावर झळकणाऱ्या या नायिकांच्या जोडीला पडद्यामागं राहून बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम करणाऱ्या ‘डीओपी’ रेशमी सरकार यांनी छायांकनाची जबाबदारी चोख बजावली आहे. शिवकालीन गड-किल्ल्यांच्या जोडीला स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राइकही प्रेक्षकांना त्यांच्या नजरेतून पहायला मिळणार आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा प्राण असणारी वेशभूषा पौर्णिमा ओक यांनी, तर रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. या दोघींनीही अतिशय कल्पकतेच्या बळावर स्वराज्यातील व्यक्तिरेखांना गेटअप आणि मेकअप केला आहे. १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरनं केलं आहे.


हेही वाचा -

तेजस्विनीमागोमाग कश्मिराची नवरात्र रूपं पाहिली का?

महालक्ष्मीचं तेजस्वी रूप पाहिलं का?


पुढील बातमी
इतर बातम्या