अवधूत, स्वप्निल, जुईलीची सांगीतिक अमेरिका वारी!

मराठीतील आघाडीचे गायकांचे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परदेशी जाणं होतं असतं. तिथे एखाद्या कार्यक्रमात ते परफॅार्मही करतात, पण आता चक्क अमेरिकेत मराठी पॉप गाण्यांचा डंका वाजणार आहे.

१२ शहरांत आयोजन

महाराष्ट्रातल्या सांगीतिक परंपरेचा ठेवा सातासमुद्रापार नेत तिथल्या मराठी जनतेला अस्सल मराठी मातीतल्या गाण्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी मराठीतील तीन आघाडीचे गायक अमेरिका वारीवर निघाले आहेत. सुरेल क्रिएशन व ३ एएमबीझ यांच्या संयुक्त विद्यमानं अमेरिकेत 'अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट'चं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं अमेरिकेतील १२ वेगवेगळ्या शहरांत प्रथमच मराठीतील पॉप गाण्यांचे लाइव्ह सूर घुमणार आहेत. 

मानसी इंगळे दिग्दर्शिका 

पोर्टलॅण्ड, डॅलस, सॅक्रामेंटो, सेंटलुईस, वॉशिंग्टन डीसी, फिलाडेल्फीया, न्यू जर्सी, बोस्टन, सॅन होजे, क्लीव्हलॅंड, नॅशवील, अटलांटा ही अमेरिकेतील शहरं मराठी पॅाप गाण्यांचा आस्वाद घेणार आहेत. गायक अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, जुईली जोगळेकर आदि गायक सुरांची ही मैफल रंगवणार असून त्यांच्यासोबत लाइव्ह म्युझिशियनचा ताफा त्यांना साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका मानसी इंगळे आहेत. काही दिवसांपूर्वी अवधूतनं स्वत:च सोशल मीडियावर स्वप्निल आणि जुईलीसह आपला फोटो शेअर करत अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याचे संकेत दिले होते.

चार आठवडे शो

अमेरिकेतल्या मराठी रसिकांसाठी हा एक आगळा-वेगळा शो असून, मराठी सुमधुर गाण्यांचा खजिना अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्टच्या निमित्तानं उलगडणार आहे. २६ एप्रिल ते १९ मे असे शुक्रवार ते रविवार सलग चार आठवडे हे शोज रंगणार आहेत. अमेरिकेतील मराठी रसिकांसाठी सुरेल संगीताची ही अनोखी मेजवानी ठरणार आहे. या शो साठी आम्ही सुद्धा उत्सुक असल्याची प्रतिक्रिया अवधूत, स्वप्निल आणि जुईली यांनी दिली. वेगळं काहीतरी करण्याच्या उद्देशानं अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट चं प्रयोजन केल्याचं दिग्दर्शिका मानसी इंगळे यांचं म्हणणं आहे.


हेही वाचा-

सावनीचा 'लताशा' आता हिंदीत


पुढील बातमी
इतर बातम्या