गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बालासुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर आहेत अशी माहिती रुग्णालयानं गुरुवारी दिली होती. मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली आहे. शुक्रवारी १ वाजून ४ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याची बातमी एसपी चरण यांनी दिली. ते 74 वर्षांचे होते.  

दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. चैन्नईमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी अधिकृत माहिती दिली. एसपी चरण यांनी डॉक्टर, हितचिंतक आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाचं निदान झालं होतं. ५ ऑगस्टला त्यांना एमजीएम हेल्थकेअर (MGM Healthcare) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी व्हिडिओद्वारे आपण बरं असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

दाक्षिणात्य सिनेमांतील संगितामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा होता. अभिनेता कमल हसन आणि अन्य काही अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली होती. गुरुवारी अभिनेता कमल हसन यांनी त्यांच्या या गायक मित्राची हॉस्पीटलमध्ये जाऊन भेट देखील घेतली होती.

बालासुब्रमण्यम यांनी सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं होतं. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं होतं.

तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल ४० हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता.

त्यांनी सकाळी ९ ते रात्री ९ या १२ तासांत तब्बल २१ गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी १६ गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.


हेही वाचा

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण

नवाझुद्दिनच्या अडचणीत वाढ, पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या