जोडी जुळवणाऱ्या ‘गॅटमॅट’चा ट्रेलर लाँच

‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं...’ ही मंगेश पाडगावकरांची कविता केवळ प्रेमवीरांनाच नव्हे तर सर्वांनाच चांगलीच ठाऊक आहे. प्रेमात पाडणाऱ्या या कवितेने अनेकांचं ‘गॅटमॅट’देखील जुळवून दिलं आहे. ‘गॅटमॅट’ म्हणजेच जोडी जुळवणाऱ्यांची कथा लवकरच पडद्यावर येणार आहे. ‘गॅटमॅट’ हेच शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचा संगीत आणि ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.

१६ नोव्हेंबरला प्रदर्शित

गोड आणि गुलाबी असणारे प्रेम जुळण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. प्रेमाचं हे ‘गॅटमॅट’ जुळताना बऱ्याचदा धांदल उडवणारे किस्सेदेखील घडतात. ‘गॅटमॅट’ हा चित्रपट यासारख्याच मजेशीर किस्स्यांची भेट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेला या सिनेमाच्या ट्रेलरचं अनावरण मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘गॅटमॅट’ सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत करण्यात आलं. 

लैला-मजनूची जोडी

तरुणाईने बहरलेल्या ‘गॅटमॅट’ चित्रपटाच्या या ट्रेलरद्वारे चित्रपटात काय पहायला मिळेल याची झलक दिसते. निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर, कॉलेज विश्वाची रंगतदार सफर प्रेक्षकांना घडवून आणतो. प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर दिसणारी लैला-मजनूची जोडी यातही आपल्याला दिसते. 

मैत्री, प्रेम, रोमान्स 

सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे अक्षय टंकसाळे, निखील वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे कलाकारदेखील ट्रेलरमध्ये एका वेगळ्याच रूपात दिसतात. शिवाय रंग्या आणि बगळ्याच्या ‘गॅटमॅट’ संस्थेचं गमतीदार कामकाजदेखील ट्रेलरमध्ये आहे. मैत्री, प्रेम आणि रोमान्स दाखवणाऱ्या ‘गॅटमॅट’च्या ट्रेलरमध्ये गमतीदार संवादांसोबतच, गाण्यांचाही समावेश आहे. 

जुन्या आठवणीत रमवणारा

सचिन पाठक लिखित, अवधूत गुप्तेच्या आवाजातलं ‘गॅटमॅट...’ या शीर्षक गीतासोबतच इतरही गाणी संगीत प्रकाशन सोहळ्यात दाखवण्यात आली. यात आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील ‘वरात...’ या गाण्याचाही समावेश होता. वरात गाजवणारं हे गाणं अभिजित खणकरने शब्दबद्ध केलं आहे. सर्व गाणी संगीत दिग्दर्शक समीर साप्तीस्करने संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खुणावणारा व जुन्या आठवणींमध्ये रमवणारा ठरेल असं ‘गॅटमॅट’च्या टीमच्यावतीने सांगण्यात येत आहे.


हेही वाचा - 

जोशींच्या ‘स्वप्ना’तील ‘संहिता’ रुपेरी पडद्यावर!

मोहन जोशी बनले ‘नटसम्राट’ आप्पा बेलवलकर


पुढील बातमी
इतर बातम्या