Advertisement

जोशींच्या ‘स्वप्ना’तील ‘संहिता’ रुपेरी पडद्यावर!

बऱ्याच सुपरहिट मालिकांनंतर मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनात रमलेल्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांची कन्या संहिता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. पहिल्या टीझरपासूनच चर्चेत आलेल्या सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटात संहिता एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

जोशींच्या ‘स्वप्ना’तील ‘संहिता’ रुपेरी पडद्यावर!
SHARES

मुलांनीही आपल्या पावलावर चालत आपल्याच क्षेत्रात पदार्पण करून आपल्यापेक्षा खूप मोठी कामगिरी करावी, असं बऱ्याच कलाकार-तंत्रज्ञ असलेल्या आई-वडिलांना वाटत असतं. काहींची मुलं आई-वडिलांच्या वाटेने जात त्यांचं स्वप्न साकार करतात. आता आणखी एक मुलगी प्रचंड मेहनतीच्या बळावर आपल्या आईच्या पाऊलवाटेने जात ‘स्वप्ना’ला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाली आहे.


'या' चित्रपटात दिसणार

बऱ्याच सुपरहिट मालिकांनंतर मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनात रमलेल्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांची कन्या संहिता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. पहिल्या टीझरपासूनच चर्चेत आलेल्या सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटात संहिता एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. स्वप्ना जोशी यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, मोहसीन अख्तर यांनी निर्मिती केली आहे.


अभिनय पाहता क्षणीच...

‘माधुरी’मध्ये संहिताच्या निवडीबाबत अख्तर म्हणाले, ‘माधुरी’ चित्रपटाचे लेखक शिरीष लाटकर यांनी मला एक शॉर्ट फिल्म दाखवली. त्या शॉर्ट फिल्ममध्ये मी संहिताचा परफॉर्मन्स पाहिला. तिचा अभिनय पाहता क्षणीच संहिताची ‘माधुरी’ चित्रपटासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. खरं तर संहिताने साकारलेली भूमिका कोणत्याही नवीन कलाकारासाठी कठीण होती, पण मला विश्वास होता की संहिता ही भूमिका करू शकते. प्रचंड मेहनतीच्या बळावर तिने आपली भूमिका सजीव केल्याचंही अख्तर म्हणाले.


संहिताच्या पदार्पणाचा चित्रपट 

३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सोनालीसोबत शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनाली-शरदसारखे नामवंत अभिनेते, ख्यातनाम दिग्दर्शिका असलेल्या आपल्या आईचंच दिग्दर्शन आणि व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्याचं आव्हान पेलण्यात संहिता यशस्वी झाली आहे का, ते ‘माधुरी’ पडद्यावर अवतरल्यानंतरच समजेल. नेहमीच पठडीपेक्षा वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वप्ना यांचा हा चित्रपट असेल यात शंका नाही. मात्र मुलीच्या पदार्पणाचा चित्रपट असल्यानं दोघींकडूनही अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा