बँकांचे व्यवहार मराठीत करा! नाहीतर खळ्ळ् खट्याक्?

महाराष्ट्रातील सर्व बँकांचे व्यवहार मराठीत झालेच पाहिजेत, नाहीतर या बँकांविरोधात आंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत दिला होता. याच पार्श्वभूमीवर सोमवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आणि अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांना मनसेकडून निवेदन देण्यात आलं.

नाहीतर खळ्ळ् खट्याक्

मराठीत व्यवहार करणं हा रिझर्व्ह बँके(आरबीआय)चा नियम असला, तरी बँका मराठीतून व्यवहार करण्याचं टाळत आहेत. या निवेदनानंतरही बँकांनी मराठीत व्यवहार न केल्यास खळ्ळ् खट्याक् करू, असा इशारा वांद्र्यातील मनसेचे उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला.

आंतरराष्ट्रीय बँकांनाही...

वांद्रे-कुर्ला परिसरात अनेक बँकांची मुख्यालयं आहेत. यांत भारतीय बँकांसोबतच आंतरराष्ट्रीय बँकांचीही कार्यालये आहेत. आम्ही आज फक्त या ३ बँकांमध्ये जाऊन निवेदन देऊन आलो आहोत. परंतु येणाऱ्या दिवसांत प्रत्येक बँकांमध्ये मनसेचे हे पत्रक पोहोचल. केवळ भारतीयच बँकच नाही, तर आंतरराष्ट्रीय बँकांनासुद्धा आम्ही सर्व व्यवहार मराठीत करायला भाग पाडू, असंही चित्रे यांनी स्पष्ट केलं.

बँकांनी दोनशे भाषांमध्ये त्यांचे व्यवहार करावेत, आमचा त्याला विरोध नाही. परंतु महाराष्ट्रात मराठीतून व्यवहार करणं बँकांना अनिवार्य आहे. राज ठाकरे यांनी ठाणाच्या सभेत सांगितल्याप्रमाणे मनसैनिक सगळ्या बँकांमध्ये जाऊन निवेदन पत्र देत आहेत. या निवेदन पत्रानुसार बँकांनी मराठीतून व्यवहार केला, तर ठिक अन्यथा त्यांना मनसेचा दणका दाखवून देऊ.

- अखिल चित्रे, वांद्रे उपविभाग अध्यक्ष, मनसे


हेही वाचा-

इतकं घोंचू, बिनडोक सरकार बघितलं नाही - राज ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या