Advertisement

इतकं घोंचू, बिनडोक सरकार बघितलं नाही - राज ठाकरे


इतकं घोंचू, बिनडोक सरकार बघितलं नाही - राज ठाकरे
SHARES

आमच्या सभा दाखवायची सरकारमध्ये हिंमत नाही. मनसेच्या सभांवेळी केबल कनेक्शन बंद करण्यात येतं. आता बंद केलं तरी ही सभा, कार्यक्रम नंतरही बघता येईलच. केबल कनेक्शन बंद करण्याने काय होणार आहे? इतकं घोंचू, बिनडोक सरकार कधी बघितलं नाही अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. ठाण्यामध्ये शनिवारी संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.


बोलायचं आम्ही, मतं मात्र त्यांना

'आम्ही प्रत्येक वेळी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आवाज उठवला, त्यांच्यासाठी आंदोलन केलं. पण मतं मात्र त्यांनाच पडतात, आम्हाला नाही',अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली खंत बोलून दाखवली.


फेरीवाला प्रश्नावर हफ्त्याचं राजकारण

किमान 2 हजार कोटींच्या हफ्त्याचा प्रश्न असल्यामुळे सर्वपक्षीय राजकारणी फेरीवाल्यांना पाठिंबा देत आहेत. उद्या हफ्ते बंद झाले, तर हे आधी फेरीवाल्यांना हाकलायला येतील असा खणखणीत आरोप यावेळी राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांवर यावेळी केला.


सुप्रीम कोर्टाकडून स्टे आणण्याचं राजकारण

दरम्यान, भाजप सरकारकडून फेरीवाला प्रश्नी नवीन खेळी खेळली जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला. या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती आणून पुन्हा फेरीवाल्यांना बसू द्यायचं असा डाव असल्याचं राज ठाकरे म्हणाले.


सिनेमा बंदीवर नाना पाटेकर का बोलत नाहीत?

काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या बाजूने बोलणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरही राज ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. फेरीवाल्यांसाठी बोलणारे नाना पाटेकर पद्मावती आणि न्यूड या दोन सिनेमांवर सुरु असलेल्या वादावर का गप्प आहेत? असा सवालच त्यांनी केला.


देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत आहे का?

कर्नाटकमध्ये कानडी भाषेचा पुरस्कार केला जातो. त्यांचे मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये रहायचे असेल, तर कानडी भाषा आलीच पाहिजे असं ठासून सांगतात. आमच्या देवेंद्र फडणवीसांमध्ये असं सांगायची हिंमत आहे का? असाही थेट सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.


बुलेट ट्रेन म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जखम

बुलेट ट्रेनवरही पुन्हा एकदा राज ठाकरेंनी शरसंधान केलं. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अहमदाबादच का सुचलं? दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाता का नाही? संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी गुजरातला झालेली जखम भरून काढण्यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे असा दावा राज ठाकरेंनी यावेळी केला.


आम्ही ब्लू प्रिंट केली, हे ब्लू फिल्म करतायत

2014 साली महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी आम्ही ब्लू प्रिंट सादर केली होती. पण आता गुजरात निवडणुकांसाठी भाजप ब्लू फिल्म आणतायत. त्याचं आयुष्य तो जगेल, तुम्ही काशाला दरवाज्याच्या फटीतून बघताय? हे असले उद्योग आंबटशौकिन करतात असा टोला राज ठाकरेंनी यावेळी लगावला.


पर्युषणासाठी फतवे काढायला तुम्ही मौलवी आहात का?

दरम्यान जैन बांधवांच्या पर्युषण काळात निर्माण झालेल्या शाकाहारी-मांसाहारी वादावरही राज ठाकरेंनी आक्षेप घेतला. पर्युषण काळात मांसाहार करायचा नाही अशा प्रकारचे फतवे काढायला तुम्ही मुल्ला-मौलवी आहात का असा प्रश्न त्यांना केला. तसेच, असं असेल, तर आम्ही गटारीच्या वेळी तुम्हाला सगळं करावं लागेल असा फतवा काढायचा का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा