मनसेला सर्व पर्याय खुले, नांदगावकरांनी दिले भाजपसोबत युतीचे संकेत?

महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपाच्या हातात हात घालून निवडणूक लढवताना दिसली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो हे सांगत मनसेला सर्व पर्याय खुले असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये सातत्याने अपयशाचा सामना करणारी मनसे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केली. तेव्हापासून भाजपकडून सातत्याने शिवसेनेवर हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचं म्हणत टीका केली जात आहे.

हेही वाचा- मनसे लोणच्याएवढीही उरली नाही, शिवसेना नेत्याची राज ठाकरेंवर टीका

ही स्पेस भरून काढण्यासाठी मनसे हिंदुत्वावादी विचारधारेच्या वाटेवर चालणार असल्याची माहिती मिळत आहे. २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात मनसे पक्षाचा झेंडा बदलून केशरी रंगाचा करणार असल्याचंही कळत आहे. 

यासंदर्भात विचारणा केल्यावर नांदगावकर म्हणाले, आम्ही आतापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांना मदत केलेली आहे. भविष्यात कोणासोबत जायचं, न जायचं हा निर्णय आमचे पक्ष प्रमुख घेतील. पक्षाने एक लाइन घेतली तर काहीही चमत्कार घडू शकतो. राजकारणात कोणीही कोणाचा कायम शत्रू वा मित्र नसतो. त्यामुळे आमच्यापुढं सर्व पर्याय खुले आहेत.

नांदगावकरांनी सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं असलं, तरी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आगपाखड करणारे राज ठाकरे पुन्हा एकदा यूटर्न घेऊन भाजपची स्तुती करणार का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

हेही वाचा- ‘मनसे’च्या झेंड्याचा रंग बदलणार?

पुढील बातमी
इतर बातम्या