राज्यसभेच्या क्रिझवर सचिन पहिल्याच बाॅलवर बोल्ड

एक वेळ होती जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बॅटींगसाठी क्रिझवर उतरला की, त्याचे कोट्यावधी चाहते हातातलं काम सोडून टीव्हीला खिळून बसायचे. यांत सर्वच वयोगटातील सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांचाही समावेश होता. पण, क्रिकेटच्या स्टेडिअममधून राजकारणाच्या क्रिझवर उतरलेल्या तेंडुलकरची स्थिती गुरूवारी पहिल्याच बाॅलवर क्लिन बोल्ड होऊन स्टेडिअममध्ये परतणाऱ्या बॅट्समनसारखी झाली. त्याचं झालं असं की राज्यसभेत 'राइट टू प्ले' या विषयावर आपलं पहिलंवहिलं भाषण करण्यासाठी उभा राहिलेल्या सचिनला २ जी घोटाळ्यावरून सुरू झालेल्या गोंधळामुळे बोलण्याची संधीच मिळाली नाही.

कधी नव्हे, तो उपस्थित झाला

काही महिन्यांपूर्वी राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील उपस्थितीवरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अधिवेशनाच्या ३४८ दिवसांच्या कामकाजापैकी सचिन फक्त २३ दिवस उपस्थित होता आणि रेखा केवळ १८ दिवसच राज्यसभेत उपस्थित होत्या. त्यातच कधी नव्हे, तो सचिन राज्यसभेत उपस्थित झाला आणि त्याहूनही विशेष म्हणजे 'राइट टू प्ले' या विषयावर महत्त्वाची भूमिका मांडण्यास सज्ज झाला.

भाषणासाठी सज्ज झाला, पण...

सचिनचं सभागृहातलं हे पहिलं भाषण असल्याने भाषणासाठी उभा राहताच केवळ सभागृह सदस्यच नव्हे, तर टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांचीही उत्सुकताही ताणली गेली. पण २ जी घोटाळ्यावरून राज्यसभेत गडबड गोंधळ सुरू झाल्याने अनेकदा तोंड उघडून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिनला चक्क एक शब्दही उच्चारता आला नाही.

कामकाज तहकूब

क्रिकेटमधील लेंडज भारतरत्न सचिनला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तुमचा गोंधळ टीव्हीवरून संपूर्ण देश बघत आहे, त्यामुळे शांत रहा, खाली बसा, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वारंवार बाजावूनही विरोधक गोंधळ घालतच राहिले. परिणामी त्यांनी दिवसभर कामकाज तहकूब केल्याने सचिनचं भाषण सुरूच होऊ शकलं नाही.


हेही वाचा-

सचिनच्या जर्सीवरून फॅन्सचा संताप, बीसीसीआयने रिटायर्ड केली १० नंबरची जर्सी!

अर्जुन तेंडुलकरच्या पाच विकेट्समुळे मुंबईची कूचबिहार ट्राॅफीमध्ये रेल्वेवर मात


पुढील बातमी
इतर बातम्या