टफ फाईट! 'संविधान बचाव रॅली'विरोधात भाजपाची 'तिरंगा रॅली'

एका बाजूला देशात संविधान बदलाचं वारं तयार केलं जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सरकारविरोधात दंड थोपटून प्रजासत्ताक दिनाला 'संविधान बचाव रॅली' काढण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या बाजूला याच दिवशी 'तिरंगा रॅली' काढून या रॅलीला जोरदार प्रत्युत्तर देण्याचं भाजपाने ठरवलं आहे.

कोण काढणार रॅली?

भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल यासह अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी २६ जानेवारीला 'संविधान बचाव रॅली'त सहभागी होणार आहेत.

'संविधान सन्मान सभे'त रूपांतर

या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी भाजपाकडून तिरंगा यात्रा काढण्यात येणार असून या रॅलीचं पुढे 'संविधान सन्मान सभे'त रूपांतर होणार आहे. ही सभा मुंबईतील कामगार मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती भाजपचे आमदार विजय गिरकर यांनी दिली.

मुंबईतील मंत्री, खासदारांचा समावेश

ही तिरंगा यात्रा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वाखाली काढण्यात येणार आहे. या यात्रेत मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार देखील सहभागी होणार असून यात्रेच्या समारोपाला होणाऱ्या संविधान सन्‍मान सभेला मुख्‍यमंत्री फडणवीस संबोधित करतील.

कुठून कुठे असेल रॅली?

२६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा शिवाजी पार्कपासून माटुंगा, रूपारेल कॉलेजकडून ही यात्रा सेनापती बापट मार्गावरून दादर रेल्‍वे स्‍टेशन फुल मार्केटकडून पुढे एल्फिन्स्टन रोड येथील हुतात्‍मा बाबू गेनू क्रीडांगण (कामगार मैदान) पर्यंत जाईल. पुढे या रॅलीचं सभेत रुपांतर होईल.


हेही वाचा-

शरद पवार, हार्दिक पटेल म्हणणार 'संविधान बचाव', मंत्रालय ते गेट वे लाँगमार्च


पुढील बातमी
इतर बातम्या