Advertisement

शरद पवार, हार्दिक पटेल म्हणणार 'संविधान बचाव', मंत्रालय ते गेट वे लाँगमार्च


शरद पवार, हार्दिक पटेल म्हणणार 'संविधान बचाव', मंत्रालय ते गेट वे लाँगमार्च
SHARES

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने मुंबईत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव लाँगमार्च काढण्यात येणार आहे. या रॅलीत माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माकप नेते सीताराम येचुरी या बुजूर्ग नेत्यांसह पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, काँग्रेसचे गुजरातमधील आमदार अल्पेश ठाकोर आणि गुजरातमधील आमदार तसेच दलित नेते जिग्नेश मेवाणी सहभागी होण्याची शक्यता आहे.

या लाँगमार्च संदर्भात देशातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा सुरु असून हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसल्याचं खा. शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी केवळ राजकीयच नाही, तर समाजातल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या मोर्चात सामील व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात संविधान बदलाचं वातावरण तयार केलं जात आहे. संविधानाला तडे देण्याचं काम सुरु असल्याने देशातील संविधानावर आधारलेली लोकशाही संकटात सापडली आहे. त्यामुळे लोकशाहीला वाचवण्यासाठी हा 'संविधान बचाव लाँग मार्च' काढण्यात येत असल्याचं खा. शेट्टी यांनी सांगितलं.


सर्वपक्षीय मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकप नेते सीताराम येचुरी, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांसह काँग्रेसचे गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणारे गणेश देवी यांना या लाँग मार्चमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.


मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया

मंत्रालयापासून ते मुंबई विद्यापीठाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुपारी १ वाजता अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. हुतात्मा चौकात ही संयुक्त महाराष्ट्रातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया इथल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथेच मूक धरणे देण्यात येणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा