जीएसटीच्या पहिला हप्त्याच्या रकमेचा धनादेश देण्याचा कार्यक्रम महापालिका सभागृहात सुरु असतानाच भाजपाचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांकडून झाला. मात्र, या धक्काबुक्कीला खुद्द नार्वेकर हेच जबाबदार असून त्यांनी शिवसैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेतील जीएसटीच्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले.
जीएसटी लागू झाल्यामुळे महापालिकेचा जकात कर बंद झाला. त्यामुळे, महापालिकेला जकातीच्या नुकसान भरपाईचा पहिला हप्ता देण्यात आला. महापालिका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे 647 कोटी 34 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
महापालिका मुख्यालयातील प्रवेश क्रमांक 3 मधून शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मुनगंटीवार, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसेच गटनेते मनोज कोटकसह इतर नगरसेवकांनी प्रवेश केला. परंतु नार्वेकर मागे राहिले.
यावेळी शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्यामुळे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. तेथूनच नार्वेकर कसेबसे आत आले. परंतु आतमध्ये प्रवेश केल्यानंतर नार्वेकर पुन्हा बाहेर गेले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी जमा झालेल्या शिवसैनिकांकडून त्यांना गेटच्या बाहेरून मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु नार्वेकर यांनी तो मार वाचवला. यावेळीही नार्वेकरांना धक्काबुक्की झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण संपल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली. भाजपाकडून मोदी… मोदी अशा घोषणा होत असताना शिवसेनेकडून चोर है… चौर है.. अशी घोषणाबाजी सुरु झाली.
शिवसेनेच्या सदस्यांनी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा निषेध म्हणून भाजपाच्या सदस्यांनी सभागृहातून बाहेर जाण्याचे ठरवले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरु होते. त्यावेळी त्यांनी ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे, कुणालाही रोखू नका, असे सांगत आपले भाषण सुरूच ठेवले.
मकरंद नार्वेकर यांनी बाळासाहेबांबद्दल अनुदगार काढले म्हणून त्यांना शिवसैनिकांना मारल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. परंतु आपण बाळासाहेबांबद्दल कोणताही अपशब्द काढला नसल्याचे स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिले. तर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी याचा निषेध व्यक्त करत एका नगरसेवकाला सभागृहाबाहेर अशाप्रकारे धक्काबुक्की करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
प्रवेश क्रमांक 3 वर मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांना रोखणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांसाठी अवघड झाले होते. नार्वेकर यांना आतमध्ये सोडल्यानंतरही ते बाहेर आले आणि त्यांच्या घोषणाबाजीने शिवसैनिक संतप्त झाले.
अशावेळी उपमुख्य सुरक्षा अधिकारी बाडकर यांनी प्रवेशद्वार अडवून संतप्त शिवसैनिकांना आतमध्ये जाण्यापासून रोखून धरले. हे प्रवेशद्वार थोडे जरी उघडला गेले असते, तरी नार्वेकर यांना आतमध्ये शिरून मारहाण झाली असती. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे नार्वेकर यांना होणारी मारहाण टळली.
मात्र, इथे तैनात असलेल्या महिला सुरक्षा रक्षकालाही जमावाकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
हे देखील वाचा -
मुनगंटीवार देणार पालिकेला 700 कोटींचा 'हप्ता'
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)