म्हाडा, मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीची गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण येथील त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील एका महिला कर्मचाऱ्याने त्यांच्यावर हा आरोप केला असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे आरोप?

चव्हाण यांच्या शैक्षणिक संस्थेतील ५७ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने २००० ते २००७ दरम्यान आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत चव्हाणी यांनी आपल्यावर बलात्कार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याविरोधात या पीडित महिलेनं २०१२ आणि २०१७ मध्ये तक्रार दाखल केली होती.

न्यायालयाचे निर्देश

परंतु दोनवेळा तक्रार दाखल करूनही विशेष कारवाई न झाल्यानं पीडित महिलेनं न्यायालयात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार न्यायालयानं तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश चिपळूण पोलिसांना दिले होते. त्यानुसार पुढील कारवाई करत अखेर पोलिसांनी नुकताच मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्कार आणि फसणवुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

आरोप खोटे

याविषयी मधू चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता आपल्यावरील सर्व आरोप धादांत खोटे असल्याचं त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे. एवढंच नाही, तर आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बदनामीचं षडयंत्र

मधू चव्हाण यांची नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सभापती पदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर काही दिवसांतच हा गुन्हा दाखल झाला आहे. या नियुक्तीनंतर आपल्याला बदनाम करण्यासाठीच हे षंडयंत्र सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. २०१२ मध्ये हे प्रकरण समोर आलं असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचंही मधू चव्हाण यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणातून आपण निर्दोष सुटू असा दावाही त्यांनी केला आहे.


हेही वाचा-

आशिष शेलार यांच्या भावाविरोधात विनयभंगाचा आरोप

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी! दूध भेसळखोरांवर कारवाई कधी?


पुढील बातमी
इतर बातम्या