स्वत:ला इतके मोठे नेते समजता, तर कोल्हापूरातून का नाही लढला? - एकनाथ खडसे

पक्षाने आतापर्यंत एकनाथ खडसे (eknath khadse) यांना बरंच काही दिलं आहे. त्याच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शक म्हणून पक्षाचं काम करावं. मुंगी होऊन साखर खावी, असा सल्ला देणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp maharashtra president) यांच्या सर्व आरोपांना एकनाथ खडसे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. 

घराणेशाहीशी संबंध नाही

मला तिकीट नाकारण्याशी घराणेशाहीचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलीसाठी मी कधीही तिकीट मागितलं नव्हतं. मला तिकीट नको म्हणून माझी मुलगी ढसाढसा रडत होती, तरी माझं तिकीट कापून बळजबरीनं ते मुलीला देण्यात आलं. मुक्ताईनगर हा अतिशय आव्हानात्मक मतदारसंघ आहे. माझ्या वैयक्तिक कामाच्या जोरावर मी आतापर्यंत निवडून यायचो. 

हेही वाचा - खडसेंनी आता स्वत:चीच समजूत घालावी- चंद्रकांत पाटील

पण सध्या माझ्या कुटुंबात केवळ माझी सून ही एकमेव खासदार आहे. त्या व्यक्तीरिक्त कुणीही नाही. सहकार क्षेत्रातील पदांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही.  घराणेशाहीचाच निकष लावायचा झाल्यास पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या केंद्रात मंत्री आहेत. तर त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पितापुत्र आमदार-खासदार आहेत, याकडे एकनाथ खडसे यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं.

त्यांना तिकीट कसं?

विधानसभेनंतर विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत नाही, हा पक्षाचा नियम असल्याचं तुम्ही सांगता, मग पडळकर त्याला अपवाद कसे ठरले, त्यांना तिकीट का दिलं?

भाजपच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त व्हायचं तेव्हापासून मी पक्षाचं काम करतोय. मुक्ताईनगरमधून निवडणुका लढतोय. चंद्रकांत पाटील ते स्वत:ला इतके मोठे नेते मानत असतील तर त्यांनी कोल्हापुरातून निवडणूक का लढली नाही, स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी मेधा कुलकर्णी यांचा राजकीय बळी का दिला? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा - मला अनेक पक्षांकडून आॅफर- एकनाथ खडसे

दरम्यान, पक्षाने आतापर्यंत खडसे यांना अनेकदा उमेदवारी दिली, विधानसभेसाठी मुलीला उमेदवारी दिली. हरिभाऊ जावळे यांना जाहीर झालेली उमेदवारी बदलून खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या मुलालाही विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या मुलीला जिल्हा बँक, पत्नीला महानंद संस्थांमध्ये पदे मिळाली. त्यावेळी जावळे, गुरुमुख जगवानी यांची खडसे यांनी जशी समजूत काढली होती, तशी समजूत एकनाथ खडसे यांनी स्वत:ची काढून घ्यावी. 

खडसेंना पक्षाने एवढं सगळं देऊनसुद्धा ते जाहीरपणे पक्षविरोधात बोलत आहेत. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली नसावी. पक्षातील वाद चव्हाट्यावर मांडणं योग्य नाही. मुंगी होऊन साखर खाणं चांगलं, असा सल्ला पाटील यांनी खडसेंना दिला.  

पुढील बातमी
इतर बातम्या