घरात दोन कोरोना पाॅझिटिव्ह असताना मुख्यमंत्री बाहेर कसे? खुलासा करा...

सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे संकेत देतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावरच निशाणा साधला आहे.

मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पाॅझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा… असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी महापौरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा- बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन, कुठंय सोशल डिस्टन्सिंग?

महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, लोकं नियम न पाळता फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे आहेत. त्या दिशेने पावलं उचलण्यात येत आहेत. लॉकडाऊन राज्य सरकारलाही नको आहे, तुम्हा आम्हाला कोणालाच नको आहे. पण वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य यंत्रणेवरील बोजा कमी करायचा असेल तर नियम पाळायलाच हवे. लोकांनी घाबरु नये, पण स्वत:ला सांभाळा आणि नियम पाळा. दैनंदिन व्यवहार चाललेच पाहिजेत, पण त्याचा अर्थ कसंही वागा आणि रुग्णसंख्या वाढावी असं होत नाही, असं म्हणत महापौरांनी कोरोनाच्या संसर्गवाढीसाठी लोकांना जबाबदार ठरवलं.

दरम्यान, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास इथं विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं. स्मारक समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्मारक भूमिपूजन सोहळ्यात झालेल्या गर्दीवरूनही सोशल मीडियावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

(bjp mla atul bhatkhalkar slams cm uddhav thackeray for violating covid 1 norms in maharashtra)

हेही वाचा- ... तर लोकल ट्रेन, माॅल, थिएटर बंद करू, महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या