पोलीस बळाचा वापर करून भाजपला रोखता येणार नाही, मुख्यमंत्र्यांना इशारा

परवापासून जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होतेय. ज्यांनी आणीबाणी लादणाऱ्यासमोर लोटांगण घातलं, त्यांनी आणीबाणीला गाडणाऱ्यांच्या नादी लागू नये हे बरं… पोलीस बळाचा वापर करून भाजपला रोखता येणार नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी लक्षात ठेवावं, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अतुल भातखळकर म्हणाले, काल पुन्हा एकदा महाभकास आघाडीचं सरकार हे न्यायालयात तोंडावर आपटलं. अन्यायकारक पद्धतीने खोटे आरोप लावून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांनी अटक केली. नारायण राणेंच्या आम्ही पूर्णपणे पाठिशी आहोत. यानिमित्ताने मी उद्धव ठाकरेंना एवढंच सांगू इच्छितो की कायद्याचा गैरवापर करून आणि पोलीस बळाचा वापर करून भाजपला आणि जनतेच्या आवाजाला त्यांना दडपता येणार नाही.

हेही वाचा- अनिल परब यांच्यावर FIR दाखल करा, अतुल भातखळकरांची मागणी

मी काही वेळापूर्वीच रत्नागिरीच्या एसपींना ईमेलद्वारे पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या अर्नेश कुमार खटल्यातील जजमेंटचा हवाला देत अनिल परब यांच्यावर २४ तासांच्या आत कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर का त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला नाही, तर आम्ही न्यायालयात दाद मागू. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शरद पवारांशी चर्चा करून ठरवतात की यांना अटक करायची की त्यांना अटक करायची? राज्य कायद्याचं असलं पाहिजे, इथं शंभर टक्के दबावतंत्राचा वापर करण्यात आला आहे. पूर्वी अटक कुणाला करायची हे वाझे ठरवत होता. आता तेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवत आहे. 

भाजपची जन आशीर्वाद यात्रा चालू राहील हे आम्ही कालच सांगितलं होतं. उद्यापासून जन आशीर्वाद यात्रेचा उरलेला कार्यक्रम आम्ही शंभर टक्के पूर्ण करू. आमच्या सर्व नवीन मंत्र्यांनी जन आशीर्वाद काढली, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. यात्रेला होणाऱ्या गर्दीवरूनच जर कारवाई करायची असेल, तर संजय राठोड यांनी जमवलेल्या गर्दीप्रकरणी आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या गर्दीवरून त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या