Advertisement

अनिल परब यांच्यावर FIR दाखल करा, अतुल भातखळकरांची मागणी

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर तात्काळ FIR दाखल करावा अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अनिल परब यांच्यावर FIR दाखल करा, अतुल भातखळकरांची मागणी
SHARES

मंत्रिपदाचा गैरवापर करून रत्नागिरीच्या एसपीवर दबाव आणणे तसंच न्याय प्रशासकीय व्यवस्थेत ढवळाढवळ केल्याची दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर तात्काळ FIR दाखल करावा अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल भातखळकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकप्रकरणी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीरपणे रत्नागिरीच्या एसपींवर दबाव आणला, कायद्याचा आणि मंत्रीपदाचा गैरवापर केला. मंत्री पदावर असूनही प्रशासकीय कामात अडथळा आणला म्हणून अनिल परब यांच्यावर एफआयआर दाखल करावा, अशी मागणी मी रत्नागिरीच्या पोलीस जिल्हा अधिक्षकांकडे पत्र पाठवून केली आहे. 

येत्या २४ तासांमध्ये यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला नाही, तर आम्ही न्यायालयात देखील दाद मागू. त्याबरोबर पोलिसांच्या विरोधात जे न्यायिक प्राधिकरण असतं, त्यांच्याकडे देखील दाद मागू, असा इशारा मी या तक्रारीच्या निमित्ताने देत आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचाही ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, योगींविरोधातील वक्तव्यावरून लक्ष्य

त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुनील रघुनाथ केदार यांनी तक्रार दाखल केली आहे. 

२०१८ साली झालेल्या दसरा मेळाव्यात भाषण करताना “ते मुख्यमंत्री कसे होऊ शकतात? जर तो योगी असेल तर त्यांनी सर्व काही सोडून गुहेत बसावं, पण ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःला योगी म्हणवत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी चप्पल घातली होती. मला वाटलं की त्यांना त्याच चप्पलाने मारलं पाहिजे.”, असं वक्तव्य केलं होतं. योगी हे केवळ भाजपचे नेते किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नसून गोरखपूर मठाचे महंत असल्याने असं वक्तव्य करुन उद्धव ठाकरेंनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळेच उद्धव यांच्याविरोधात कलम १५३ अ (१), १५३ (ब), १८९, २९५ अ. ५०४, ५०५ (२) आणि ५०६ अंतर्गत तक्रार दाखल करावी असं म्हटलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा