
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झाले. एकीकडे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना, दुसरीकडे येणाऱ्या दिवसांत हेच पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Faction) नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पुढील काळात अजित पवार गटाची दिशा, निर्णयप्रक्रिया आणि राजकीय रणनिती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? या शक्यतेवर आता राष्ट्रवादीतील नेते भाष्य करीत आहेत.
नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
“आता सत्य बोलणं गरजेचं आहे. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असं अजित पवार म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल होईल,” असं सूचक विधान शशिकांत शिंदे यांनी केलंय.
दरम्यान, अजित पवार यांनीही यापूर्वी एका जाहीर सभेत, “आम्ही एकत्र आलो की काही लोकांच्या पोटात दुखायला का लागतं?” असा सवाल उपस्थित करत एकत्र येण्याच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला होता.
पुढील काही दिवसांत खासदार सुनेत्रा पवार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे संघटनात्मक किंवा थेट राजकीय अनुभव नसल्याने ही बाब पक्षासाठी अडचणीची ठरू शकते.
तसेच, मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडेही नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याइतका पुरेसा अनुभव नसल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्यता सध्या नाकारता येत नाहीत. भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यामुळे शरद पवार जर भाजपासोबत युतीसाठी तयार असतील, तरच हे नेते त्यांना साथ देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार अनंतात विलीन
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता.
हेही वाचा
