सचिन वाझेंचा गाॅडफादर कोण?, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

ज्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या कथित सहभागाचा आरोप होत आहे, तो सर्व प्रकार एकटा माणूस करूच शकत नाही. त्यामुळे सचिन वाझे यांचा गाॅडफादर नेमका कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच सत्य बाहेर येईल, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. 

नितेश राणे यांनी भाजप (bjp) प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे आणि ठाकरे सरकार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत माणसाच्या घराबाहेर स्कॉर्पिओ ठेवली जाते, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यात वाझेंचा हात असल्याचं म्हटलं जातं. हा सर्व प्रकार एकटा माणूस करु शकत नाही. यामागे नक्कीच बड्या व्यक्ती आणि शक्ती असाव्यात. याची एनआयएने चौकशी करावी. जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाइंट कोण आणि गॉडफादर कोण हे बाहेर येणार नाही, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा- गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, राष्ट्रवादीने केलं स्पष्ट

सचिन वाझे यांना अटक होण्यापूर्वी ते सकाळी ११ वाजता कोणाला भेटायला गेले होते, याचीही चौकशी झाली पाहिजे. वाझेंबरोबर शिवसेनेच्या (shiv sena) उपनगरातील एका नेत्यासोबत टेलिग्रामचं चॅट आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.

आयपीएलवर सल्ला लावणाऱ्या सट्टेबाजांना सचिन वाझेंकडून फोन जातो. दीडशे कोटी रुपये न दिल्यास छापा मारू, अशी धमकी दिली जाते. त्यानंतर असाच फोन वाझेंना जातो आणि हिश्श्याची मागणी केली जाते. ही व्यक्ती म्हणजे वरुण सरदेसाई. कोणत्याही घटनात्मक पदावर नसलेल्या सरदेसाई यांना ठाकरे सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. शासकीय बैठकांनाही ते उपस्थित असतात. अधिकाऱ्यांना ते थेट दूरध्वनी करतात. त्यामुळे सरदेसाईंनी वाझे यांच्याशी कोणत्या कारणासाठी किती वेळा संपर्क साधला याचीही चौकशी ‘एनआयए’ने करावी, अशी मागणही नितेश राणे यांनी केली आहे.

 या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील भाजपकडून केली जात आहे.

हेही वाचा- पोलीस अधिकारी सचिन वाझे निलंबित
पुढील बातमी
इतर बातम्या